Devendra Fadnavis : नगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) यांच्या कार्याचा आदर्श कायम स्मरणात राहणार आहे. त्यांच्या जीवनकार्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने चौंडी (Choundi) गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक विकासकामे हाती घेण्यात आलेली आहेत. चाैंडीचा विकास सर्वसमावेशक व नियोजनबद्ध पद्धतीने करत दर्जेदार सुविधांच्या माध्यमातून पर्यटनास चालना देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले.
नक्की वाचा : बोगस बियाणे व खतांवर कडक कारवाई करा : आमदार राजळे

फडणवीस म्हणाले की
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळ, चाैंडी येथील जतन, संवर्धन व विकास आराखड्यासंदर्भात बैठक वर्षा निवासस्थान येथे झाली. या बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, चोंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी ६८१ कोटींची तरतूद करण्यात आली असून, या प्रकल्पांतर्गत स्मारक परिसरात भव्य पुतळा, सुशोभित उद्यान, नदीकाठाचा विकास, आधुनिक संग्रहालय, ओपन एअर थिएटर आणि पर्यटन सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जलव्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर विशेष भर (Devendra Fadnavis)
स्मारक परिसरात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता करण्यासाठी जलव्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात यावा. तसेच हरित क्षेत्र आणि मोकळ्या जागांचा समतोल राखत परिसराचे सौंदर्यीकरण करावे.बुडीत बंधाऱ्यांऐवजी ‘बॅरेज’ उभारण्याबाबत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. मंदिर परिसरातील भूसंपादन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करावे. प्रकल्पातील काही सुविधा उभारणी व देखभालीसाठी खासगी भागीदारी (पीपीपी मॉडेल) आणण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असून, यामुळे पर्यटन सुविधा अधिक दर्जेदार, कार्यक्षम व दीर्घकालीन टिकाऊ पद्धतीने विकसित करता येणार असल्याचे श्री फडणवीस म्हणाले.

प्रकल्पासाठी आवश्यक जागेच्या सीमारेषा निश्चित
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 360 कोटींच्या रस्ते प्रकल्पातील दोन कामांसाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक जागेच्या सीमारेषा निश्चित करण्यासाठी वन, सार्वजनिक बांधकाम, जलसिंचन विभाग आणि ग्रामपंचायत यांनी संयुक्त मोजणी केली असून सीमारेषा निश्चित करण्यात आल्या आहेत. चोंडी येथील स्मारकाचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने आणि टप्प्याटप्प्याने केला जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा शासनाचा मानस
विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे म्हणाले, चोंडी विकास आराखड्यात इतिहास, संस्कृती आणि पर्यटन यांचा समन्वय साधत स्थानिक विकास व रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा शासनाचा मानस आहे. याशिवाय परिसराचे सौंदर्यीकरण, जलसौंदर्य, हरित क्षेत्र, तसेच पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करून चोंडीला आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून उभारण्याचे नियोजन आहे. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, नियोजन विभागाच्या शैला ए, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



