Jyoti Gade | वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम; महापौर ज्योती गाडे यांनी दिली माहिती

0

Jyoti Gade | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील विविध उपसा केंद्रांवरील वीजपुरवठा मागील महिन्यापासून सातत्याने खंडित होत असल्याने शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाला आहे. १ एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत मुळानगर, विळद, नागापूर आणि वसंत टेकडी येथील उपसा केंद्रांवर तब्बल ३१ वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याची नोंद आहे. या वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शहरातील पाणी वितरणाच्या टाक्या वेळेत भरता येत नाहीत. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा करण्यात अडथळे निर्माण होत असल्याची माहिती महापौर ज्योती गाडे (Jyoti Gade) यांनी दिली. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अवश्य वाचा-  खरीप हंगामासाठी सर्वंकष नियोजन करावे : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

महापौर गाडे यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली (Jyoti Gade)

शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याबाबत महापौर गाडे यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, पाणीपुरवठा योजनेवरील उपसा केंद्रांचा वीजपुरवठा काही मिनिटांसाठी जरी खंडित झाला, तरी यंत्रणा पुन्हा सुरळीत होऊन पाणी उपसा पूर्ववत होण्यासाठी काही तासांचा अवधी लागतो. सध्याच्या नोंदीनुसार १ एप्रिलपासून मुळानगर, विळद, नागापूर आणि वसंत टेकडी या मुख्य केंद्रांवर वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. सकाळ, दुपार आणि काही वेळेस मध्यरात्रीही वीज जात असल्याने पाणी उपसा बंद होतो. परिणामी, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभांमध्ये (टाक्यांमध्ये) आवश्यक पाणीसाठा निर्धारित वेळेत जमा होऊ शकत नाही. टाक्या वेळेत न भरल्यामुळे शहराच्या विविध भागांत पाणी वितरणाचे नियोजन विस्कळीत होऊन नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात मोठे अडथळे निर्माण झाले आहेत.

नक्की वाचा- जन्म-मृत्यूचे दाखले ते नळ कनेक्शन मिळणार एका क्लिकवर!

वीजपुरवठा खंडित (Jyoti Gade)

वीजपुरवठ्यातील निर्माण झालेली अडचण ही महावितरणकडून वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्भवली आहे. यासंदर्भात महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येत आहे. या परिस्थितीत नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर ज्योती गाडे यांनी केले आहे. पाणीपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत आणि सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here