The Thiya Movement: डॉ. गौरी चौरे आत्महत्या प्रकरणी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन 

पोलीस ठाणे परिसरात तणावपूर्ण वातावरण

0

The Thiya Movement: पारनेर: गोरगाव येथील डॉ. गौरी सुनील चौरे आत्महत्या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने संतप्त नागरिकांनी आज (ता.११) पारनेर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन (The Thiya Movement) छेडले. दहा दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत नागरिक, नातेवाईक व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले होते.  “आरोपींना तात्काळ अटक करा” तसेच “पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.  तर तीन दिवसांत आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलीस उपाधीक्षक शिरीष वमणे यांनी दिले. 

अवश्य वाचा- पारनेरकरांनी अनुभवला निकाली कुस्त्यांचा थरार; सोलकर व कावरेने वेधले लक्ष

पोलीस ठाणे परिसरात तणावपूर्ण वातावरण (The Thiya Movement)

महिला डॉ. गौरी चौरे हुंड्यासाठी व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू व सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आरोपी अद्याप फरार असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. आंदोलनामुळे पोलीस ठाणे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस प्रशासनाला दोन स्वतंत्र निवेदने देण्यात आली. पहिल्या निवेदनात डॉ. गौरी चौरे यांनी गोरेगाव येथे आत्महत्या केल्याचा उल्लेख करत तिच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पती, सासू व सासऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. आरोपी खुलेआम फिरत असून त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची तसेच पीडित कुटुंबीयांवर दबाव येण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. आरोपींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या विलंबित कारवाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

नक्की वाचा- घरासमोरील शेडमधून तीन शेळ्या चोरीला; ३० हजारांचा ऐवज लंपास

तीन दिवसांत आरोपींना अटक करण्याचे आश्वासन (The Thiya Movement)

“महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये तत्काळ कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, या प्रकरणात दहा दिवस उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने जनतेचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत होत आहे, तसेच या प्रकरणाचा वेगाने तपास करून पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनाची माहिती मिळताच पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते  यांनी तातडीने पोलीस उपाधीक्षक  शिरीष वमणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची गंभीरता निदर्शनास आणून दिली. वमणे हे तातडीने पारनेर पोलीस ठाण्यात दाखल झाले व त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी चर्चा करून येत्या तीन दिवसांत संबंधित आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले.