Bhandardara: भंडारदरा परिसरातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण: डॉ. नवले

शेतीसाठीही शाश्वत पाणी उपलब्ध होण्याची अपेक्षा

0

Bhandardara: अकोले: भंडारदरा (Bhandardara) धरण परिसरातील शेतकऱ्यांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीला आता गती मिळताना दिसत आहे. किसान सभेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या संदर्भातील प्राथमिक सर्वेक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. आता पुढील प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यामध्ये विशेष पुढाकार घेऊन भंडारदरा परिसरातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी किसान सभेच्यावतीने डॉ. अजित नवले यांनी केली.

अवश्य वाचा- अहिल्यानगर जिल्ह्यात उष्मालाटेचा ‘यलो अलर्ट’; उष्माघातापासून बचावासाठी प्रशासनाचे आवाहन

शेतीसाठीही शाश्वत पाणी उपलब्ध होण्याची अपेक्षा (Bhandardara)

राजूर ते लोणी या किसान सभेच्या लॉंग मार्चदरम्यान भंडारदरा परिसरातील पाणीप्रश्न हा प्रमुख मुद्दा म्हणून मांडण्यात आला होता. या मागणीची दखल घेत संबंधित विभागाकडून प्राथमिक स्तरावरील पाहणी व सर्वेक्षण प्रक्रिया पार पडली. या सर्वेक्षणानुसार भंडारदरा धरण परिसरात १२ बुडीत बंधारे उभारणे, तसेच भंडारदरा धरणाच्या भिंतीवर उंच टाकी उभारून सोलर पंपच्या माध्यमातून पाणी उचलण्याची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या टाकीत पाणी साठवून परिसरातील गावांना व शेतीला गुरुत्वाकर्षण पद्धतीने (ग्रॅव्हिटीने) पाणीपुरवठा करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. या योजनेमुळे भंडारदरा परिसरातील अनेक गावांतील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीसाठीही शाश्वत पाणी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.