
Kashti Market : श्रीगोंदा : शेतकऱ्यासाठी (Farmers) त्याचं पशुधन हे केवळ उत्पन्नाचं साधन नसतं, तर तो त्याच्या कुटुंबाचाच एक भाग असतो. एकिकडे प्राण्यांवरील क्रूरतेच्या बातम्यांनी मन सुन्न होत असताना, श्रीगोंद्यात मात्र, माणुसकीचं एक अनोखं दर्शन घडलं आहे. कडकडत्या उन्हात व्याकुळ झालेल्या आपल्या लाखमोलाच्या नव्या म्हशीला (Buffalo) चटके बसू नयेत म्हणून, एका तरुण शेतकऱ्याने आणि त्याच्या सहकाऱ्याने स्वतःच्या डोक्याचं उपरणं म्हशीच्या डोक्यावर पांघरलं. काष्टीच्या जनावरांच्या बाजारातून (Kashti Market) घरी परतताना श्रीगोंद्याच्या शनि चौकात घडलेला हा भावुक प्रसंग सध्या चांगलाच चर्चेत असून, या अनोख्या प्राणिप्रेमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नक्की वाचा : श्रीगोंद्यातील संत शेख महंमद देवस्थानची वक्फ बोर्डाकडील नोंद रद्द करा; धर्मादाय उप आयुक्तांचे आदेश
गरम वाफांमुळे म्हैस कमालीची अस्वस्थ
शनिवारच्या प्रसिद्ध काष्टी जनावरांच्या बाजारातून एका शेतकऱ्याने लाखो रुपये मोजून एक दुभती म्हैस खरेदी केली. तिला घरी नेण्यासाठी एका पिकअप गाडीची व्यवस्था करण्यात आली. दुपारी उन्हाचा पारा ४० अंशांच्या पार गेला होता. गाडी सुरू झाल्यानंतर काही अंतरावर जाताच, कडक ऊन आणि गरम वाफांमुळे ती म्हैस कमालीची अस्वस्थ झाली. लाखो रुपयांचे जनावर उन्हाने व्याकुळ होत असल्याचे पाहून गाडीत सोबत असलेल्या तरुण शेतकऱ्याचे काळीज हेलावले. स्वतःला उन्हाचे चटके बसत असतानाही त्याने क्षणाचाही विलंब न लावता स्वतःच्या डोक्याला बांधलेले पांढरे शुभ्र उपरणं काढले. चालत्या गाडीत तोल सांभाळत त्याने ते उपरणं अत्यंत मायेने त्या म्हशीच्या डोक्यावर आणि डोळ्यांवर पांघरले, जेणेकरून तिला उन्हाचा थेट त्रास होणार नाही.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शेतकऱ्याने केलेले कृत्य क्रूर समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे (Kashti Market)
पैशाने जनावर विकत घेता येते, पण त्या मुक्या प्राण्याबद्दलची संवेदना आणि अथांग माया बाजारात विकत मिळत नाही, हेच या मातीच्या लेकाने सिद्ध केले. आजच्या व्यावसायिक युगात दररोज जनावरांची कत्तलखान्याकडे होणारी निर्दयी वाहतूक आणि पोलिसांच्या कारवायांच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये झळकत असतात. मुक्या प्राण्यांचे प्राण पैशाच्या हव्यासापोटी कवडीमोलाचे ठरत चालले आहेत. अशा संवेदनशील आणि विदारक पार्श्वभूमीवर, श्रीगोंद्यातील या तरुण शेतकऱ्याने केलेले कृत्य क्रूर समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे आणि मानवी संस्कृतीचे खरे सौंदर्य दाखवणारे ठरले आहे.


