Pathardi Municipal Council : पाथर्डीतील जुन्या पालिका इमारतीत चोरी; ४२ हजारांचा ऐवज लंपास

पोलिसांत तक्रार दाखल होण्यासाठी लगला तब्बल आठ दिवसांचा विलंब

0
Pathardi Municipal Council : पाथर्डीतील जुन्या पालिका इमारतीत चोरी; ४२ हजारांचा ऐवज लंपास
Pathardi Municipal Council : पाथर्डीतील जुन्या पालिका इमारतीत चोरी; ४२ हजारांचा ऐवज लंपास

Pathardi Municipal Council : पाथर्डी: येथील नगरपालिकेच्या (Pathardi Municipal Council) जुन्या इमारतीमधून भजनाचे पितळी टाळ, एअर कुलर, एसीचा कॉम्प्रेसर (AC Compressor) तसेच सोलरचे वायर व कनेक्टर असा तब्बल ४२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास (Stolen) केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही घटना १२ मे रोजी घडूनही याबाबतची तक्रार तब्बल आठ दिवसांनी पोलिसांत दाखल करण्यात आल्याने पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नक्की वाचा : ऑनलाइन औषधे विक्रीवर निर्बंध घालण्याची मागणी; कर्जतमध्ये मेडिकल बंद ठेवत दर्शवला विरोध

तीन चोरटे पळून गेल्याचे तक्रारीत नमूद

नगरपालिकेचा कारभार सध्या नव्या प्रशासकीय इमारतीतून सुरू असून जुन्या पालिका कार्यालयात विविध साहित्य ठेवण्यात आले आहे. पालिकेचा वाहन चालक सागर काळोखे हा १२ मे रोजी रात्री सुमारे दहा वाजता पालिकेतून घरी जात असताना त्याला जुन्या कार्यालयाजवळ काही साहित्य खाली टाकलेले दिसले. त्यावेळी तेथे माईक व इतर जुने साहित्य पडलेले होते. काळोखे यांनी पाहताच तेथून तीन चोरटे पळून गेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सोलर वायर व कनेक्टर चोरीला गेल्याचे निदर्शनास (Pathardi Municipal Council)

घटनेनंतर काळोखे घरी गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर १३ मे रोजी काही अधिकारी व कर्मचारी जुन्या पालिका इमारतीत गेले असता तेथून ४५ पितळी भजन टाळ (किंमत २२ हजार ५०० रुपये), पाच हजार रुपयांचा एअर कुलर, दहा हजार रुपयांचा एसी कॉम्प्रेसर तसेच पाच हजार रुपयांचे सोलर वायर व कनेक्टर चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांत तक्रार दाखल होण्यासाठी लगला तब्बल आठ दिवसांचा विलंब

चोरीसारखी गंभीर घटना घडूनही संबंधित कर्मचाऱ्याने तत्काळ वरिष्ठांना माहिती दिली नाही, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पोलिसांत धाव घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चोरीची घटना १२ मे रोजी घडली, १३ मे रोजी साहित्य चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले, तरी पोलिसांत तक्रार दाखल होण्यासाठी तब्बल आठ दिवसांचा विलंब का झाला, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.दरम्यान, बुधवारी (ता. २०) अखेर या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.