IAS Tukaram Mundhe : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची वारंवार बदली होण्याचे कारण नेमकं काय?

0
IAS Tukaram Mundhe : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची वारंवार बदली होण्याचे कारण नेमकं काय?
IAS Tukaram Mundhe : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची वारंवार बदली होण्याचे कारण नेमकं काय?

नगर : आपल्या कामाच्या धडाडीमुळे सातत्याने चर्चेत असलेले वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढें (IAS Tukaram Mundhe) यांनी नुकताच अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. दीड महिन्याआधीच मुंढेंची दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली झाली होती. सिंघम अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढेंची २१ वर्षाच्या कार्यकाळात करण्यात आलेली ही २५ वी बदली आहे. मात्र तुकाराम मुंढेंची वारंवार बदली का (Why is Tukaram Mundane replaced frequently) होते? यामागे नेमकी कारणे काय आहेत हेच आपण जाणून घेऊ…

नक्की वाचा : शिर्डी रेल्वे स्थानकाला ‘स्टेबलिंग लाइन’चा काय फायदा होणार?

मागील काही दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशासन खाते हे लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चर्चेत आले आहे. त्यामुळे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंची याठिकाणी बदली करण्यात आलीय. तसा आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केला होता. एप्रिलमध्ये,मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून बदली करून मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखालील आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. पण या ठिकाणचा कार्यभार व्यवस्थित समजून घेण्याआधीच त्यांची बदली करण्यात आली. मात्र त्यांच्या बाबतीत असं वारंवार का होते, याला अनेक कारणे आहेत.

अवश्य वाचा: २०२९ च्या निवडणुकीत बारामतीतून कोण लढणार? युगेंद्र पवार काय म्हणाले?

तुकाराम मुंढेच्या बदलीची कारणे (IAS Tukaram Mundhe)

तुकाराम मुंढेंच्या सततच्या बदल्यांचा प्रवास केवळ प्रशासकीय नाही, तर व्यवस्थेच्या मानसिकतेचे प्रतीक असल्याचं बोललं जात आहे. तुकाराम मुंढें हे भ्रष्टाचार, अनियमितता किंवा राजकीय दबाव यांना झुकत नाहीत. पण याच गोष्टी त्यांच्या विरोधात वापरल्या जात असल्याचं बोललं जात. मुंढेंच्या काम करण्याच्या शैलीमुळे सत्ताधारी देखील नाराज होत असतात. आणि याचमुळे त्यांना एका पदावरून दुसऱ्या आणि दुसऱ्या पदावरून तिसऱ्या पदावर नियुक्त केलं जातं. सत्ताधाऱ्यांच्या या सोयीच्या राजकारणामुळे प्रामाणिक मुंढेंसारख्या अधिकाऱ्याचं डिमोशन होत असते. 

राज्यात महायुतीचे सरकार आले, तेव्हा प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात तुकाराम मुंढे यांना कुटुंब कल्याण विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी त्यांनी बीड, अकोला, परभणी, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यांत कर्मचाऱ्यांना शिस्त लावली. आरोग्य अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासाठी तंबी देणं असो की, भोंगळ कारभार करणाऱ्यांना तंबी देणं, असा कामाचा सपाटा सुरू केला. हे सुरू असतानाच शासनाने मुंढेंना दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे पदभार सोपवण्यास सांगितलं.

मुंढेंची २१ वर्षाच्या कारकीर्दीत २५ वी बदली  (IAS Tukaram Mundhe)

आयएएस तुकाराम मुंढे हे जनसामान्यांची वैध कामे नेहमी करतात. त्यांना नोकरशाहीतील सिंघम म्हटलं जातं. मात्र अशा प्रामाणिक अधिकाऱ्याला विरोध होतो? कारण तुकाराम मुंढे कधीच जिथं सही कर म्हटलं तिथं डोळे झाकून सही करत नाहीत,असं म्हटलं जातं. अनेकवेळा तर त्यांच्या शिस्तीमुळे खात्यातील अधिकारी वर्गही त्यांच्याविरोधात जात असतो. मुंढेंनी आपल्या कारकीर्दीत २५ वी बदली घेतली आहे, पण त्यांनी आपला काम करण्याची पद्धत मात्र बदललेली नाही.

सत्ताधारी, राजकारणी आणि तुकाराम मुंढे यांच्यामध्ये अनेकदा वाद झाल्याच्या बातम्या सुद्धा आपण ऐकलेल्या आहेत. नागपूर महापालिकेत, मुंढेंचा महापौरांसोबत वाद झाला होता. त्यावेळी मुंढेंविरोधात, सत्ताधारी आणि विरोधक असा सामना रंगला होता. इतकंच नाही तर नितीन गडकरींनीही या वादात उडी घेतली. त्यानंतर शेवटी मुंढेंची बदली झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंढेंची पुण्यावरून नाशिकला नियुक्ती केली होती, मात्र तेथे सत्ताधारी नेत्यांनी त्यांना टार्गेट केले.

मुंढेंनी महापालिकेतील कामाला शिस्त लावत कोट्यवधी रुपयांची बचत केली होती. मात्र नगरसेवकांना ते आवडलं नव्हतं. त्यामुळे नाशिकमध्ये असताना तुकाराम मुंढेंविरोधात भाजपच्याच नगरसेवक आणि आमदारांनी मोहिम उघडली होती. दिव्यांग विभागात काम करताना सुद्धा त्यांनी घेतलेल्या ठोस निर्णयामुळे अनेक फेक अपंगांना घरी बसावे लागले. दिव्यांगाच्या नावाने सरकारी पैसे उकळणाऱ्यांवर तुकाराम मुंढेंनी चाप लावला.

कनिष्ठ स्तरावरील ८०० अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्यावर वरिष्ठ स्तरावरही खोटी प्रमाणपत्रे घेऊन नोकरी मिळवलेल्या लॉबीला तुकाराम मुंडे दिव्यांग विभागात सचिव म्हणून नको होते. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर मुंढेंच्या बदलीसाठी प्रयत्न करण्यात आले. तर अशी अनेक कारण तुकाराम मुंढे यांच्या बदलीमागे आहेत. मात्र असं असले तरी तुकाराम मुंडे यांनी कधीच आपल्या कार्यशैलीशी तडजोड केली नाही. त्यामुळेच त्यांना ‘सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी’ पुरस्कार आणि ‘महाराष्ट्राचे जलरक्षक’ पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.