Chandrabhan Ghogare Patil : स्व. चंद्रभान घोगरे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोणी येथे अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन 

ग्रामविकास आणि लोकसेवा या क्षेत्रात स्व. चंद्रभान घोगरे पाटील यांनी दिलेले योगदान अतुलनीय

0
Chandrabhan Ghogare Patil : स्व. चंद्रभान घोगरे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोणी येथे अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन
Chandrabhan Ghogare Patil : स्व. चंद्रभान घोगरे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोणी येथे अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन

Chandrabhan Ghogare Patil : राहाता :  शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे (Shirdi Legislative Assembly Constituency) पहिले आमदार तथा सहकार, शिक्षण, कृषी व ग्रामविकास क्षेत्रातील ज्येष्ठ नेते स्व. चंद्रभान भाऊसाहेब घोगरे पाटील (Chandrabhan Ghogare Patil) यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोणी (Loni) येथे विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गावातील शैक्षणिक, सामाजिक व सहकारी संस्थांनी कृतज्ञतापूर्वक त्यांच्या कार्याला उजाळा देत विनम्र अभिवादन केले.

नक्की वाचा : सासू-सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून जावयाने संपवले जीवन; पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख

लोणी येथील रयत शिक्षण संकुलात प्राचार्य डहाळे सर, अमोल कडू सर तसेच शिक्षक वृंद, अमोल घोगरे, सचिन मुन्ना आहेर, सुहास आहेर,गौतम आहेर यांच्या उपस्थितीत स्व. घोगरे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.तसेच ग्रामपंचायत कार्यालय, लोणी खुर्द, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी तसेच स्व. घोगरे पाटील यांच्या स्मृतीस्थळीही अभिवादन कार्यक्रम पार पडला. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

ग्रामविकास आणि लोकसेवा या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय (Chandrabhan Ghogare Patil)

उपस्थित मान्यवरांनी स्व. चंद्रभान दादा घोगरे पाटील यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. सहकार, शिक्षण, ग्रामविकास आणि लोकसेवा या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे सांगण्यात आले. शिर्डी मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून त्यांनी केलेले कार्य, सर्वसामान्य जनतेशी ठेवलेला जिव्हाळा आणि विकासासाठी घेतलेले पुढाकार आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.

निस्वार्थ लोकसेवा हीच त्यांची खरी ओळख

स्व. चंद्रभान दादा घोगरे पाटील यांनी पोलीस पाटील, सरपंच, सहकारी संस्थांचे संचालक व अध्यक्ष, प्रवरा सहकारी साखर कारखाना ,प्रवरा सहकारी बँक, प्रवरा शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत समाजविकासासाठी आयुष्य समर्पित केले. साधी राहणी, लोकांशी आत्मीयतेचे संबंध आणि निस्वार्थ लोकसेवा हीच त्यांची खरी ओळख होती. 

घोगरे कुटुंबीय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ नेते आबासाहेब आहेर, उत्तमराव आहेर, आप्पासाहेब घोगरे, देवमन घोगरे, दिलीपराव घोगरे, दीपक घोगरे, बाळासाहेब गाडगे, एकनाथ पाटील घोगरे, सरपंच जनार्दन घोगरे, दत्तात्रय घोगरे यांच्यासह घोगरे कुटुंबीय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. चंद्रभान भाऊसाहेब घोगरे पाटील यांनी भूषविलेली प्रमुख पदे

१९४३ – पोलिस पाटील, लोणी खुर्द

१९४९ – सदस्य, प्रवरा सहकारी साखर कारखाना, प्रवरानगर

१९५० ते १९९० – संचालक, प्रवरा सहकारी साखर कारखाना

१९५२ ते १९५३ – सरपंच, लोणी खुर्द

१९५५ ते १९५६ – सदस्य, रयत शिक्षण संस्था

१९६० – संचालक, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

१९६० – संचालक, श्रीरामपूर देखरेख खरेदी-विक्री संघ

१९६० – संचालक, श्रीरामपूर तालुका विकास बोर्ड

१९६४ – संस्थापक संचालक, श्रीरामपूर तालुका सूतगिरणी

१९६४ ते १९९० – सदस्य, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था

१९७२ – सदस्य व मुख्य प्रवर्तक, प्रवरा सहकारी बँक

१९७२ ते १९७४ – अध्यक्ष, प्रवरा सहकारी बँक

१९७५ – संस्थापक विश्वस्त, प्रवरा मेडिकल ट्रस्ट

१९७६ – अध्यक्ष, प्रवरा सहकारी साखर कारखाना

१९७६ – अध्यक्ष, प्रवरा ,शेती, औजारे उत्पादन संस्था

१९७८ ते १९८० – आमदार, शिर्डी विधानसभा मतदारसंघ (इंदिरा काँग्रेस)

“सहकार, शिक्षण, ग्रामविकास, कृषी विकास, लोकसेवा या क्षेत्रातील त्यांचे योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे.”