Prajakt Tanpure : नगर : विधान परिषदेच्या (Legislative Council) अहिल्यानगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. आज (ता. १) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) उमेदवार जाहीर केले मात्र, प्रत्यक्षात कोणीही उमेदवारी अर्ज दाखल न करता प्राजक्त तनपुरेंना (Prajakt Tanpure) विजयाचा मार्ग सुकर केल्याची राजकीय चर्चा आहे.
नक्की वाचा : आधी स्वतःच्या पक्षाकडे पाहा; संजय राऊतांवर विखेंचा पलटवार
महायुतीच्या वाटाघाटीत जागा भाजपला
ही निवडणूक जाहीर होताच महायुतीत भाजपकडे ही जागा असणार अशी चर्चा होती. त्यानुसार महायुतीच्या वाटाघाटीत ही जागा भाजपला मिळाली. मात्र, भाजपचा उमेदवार कोण यावर अनेक नावांची चर्चा होती. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ऐन वेळी भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली. त्यामुळे देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम हे नाराज झाले. त्यांनी बंडाळी केली नसली तरी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
ससाणे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या वाटाघाटीत ही जागा काँग्रेसला देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार श्रीरामपूरचे काँग्रेस नेते करण ससाणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. आपल्याला पक्षाचा एबी फॉर्म मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या हाती वाटाण्याच्या अक्षदा मिळाल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी घेतलेली बैठकही फार्स ठरली.
गणेश भोसले यांची चक्क प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी काल (ता. ३१) प्रसार माध्यमांना संदेश पाठवत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणी लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्ष राणी लंके उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्याच नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नगरसेवक गणेश भोसले यांनीही चक्क प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांना त्यांनी उमेदवारी मागितली. मात्र, प्रत्यक्षात जगताप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.
एकट्या प्राजक्त तनपुरे यांचे चार अर्ज
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपेपर्यंत पाच जणांचे आठ उमेदवारी अर्ज प्रशासनाकडे दाखल झाले होते. यात एकट्या प्राजक्त तनपुरे यांचे चार अर्ज आहेत. तर करण ससाणे, कमलेश गांधी, मच्छिंद्र धुमाळ व दत्तात्रेय पानसरे यांचे प्रत्येकी एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल आहेत. तनपुरे यांच्या विरोधातील सर्व उमेदवार अपक्ष आहेत. याच मतदार संघातील मागील दोन निवडणुकांत अरुण काका जगताप यांनी पक्ष उमेदवारी करत विजय मिळवला होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारी नंतरच या निवडणुकीचे पुढील चित्र स्पष्ट होणार असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.
या निवडणुकीतील पक्ष निहाय मतदार संख्या
भाजप २०७
राष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट) – ३०
शिवसेना (ठाकरे गट) – ६
काँग्रेस – ३१
राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प. गट) – ६०
शिवसेना (शिंदे गट) – ४७
सत्यजित तांबे गट – ३१
प्राजक्त तनपुरे गट – २०
शंकरराव गडाख गट – ११
वंचित बहुजन आघाडी – ३
बसप – १
अपक्ष – ८
एमआयएम – २
इतर – ४
एकूण ४६१ नगरसेवक मतदार



