FDA : ‘भंडारा म्हणजे शुद्ध हळद’ म्हणून जाहीर करा; आमदार विक्रम पाचपुतेंची तुकाराम मुंडेंकडे मागणी

0
FDA : 'भंडारा म्हणजे शुद्ध हळद' म्हणून जाहीर करा; आमदार विक्रम पाचपुतेंची तुकाराम मुंडेंकडे मागणी
FDA : 'भंडारा म्हणजे शुद्ध हळद' म्हणून जाहीर करा; आमदार विक्रम पाचपुतेंची तुकाराम मुंडेंकडे मागणी

FDA : नगर : महाराष्ट्रातील तमाम जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या जेजुरी गडासह राज्यातील विविध प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त आणि केमिकलयुक्त भंडाऱ्याची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर समस्येकडे आणि भाविकांच्या सुरक्षेकडे लक्ष वेधत भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन त्यांना एक विशेष निवेदन दिले आहे. “भंडारा म्हणजे शुद्ध हळद” म्हणून जाहीर करा, अशी मागणी आमदार पाचपुते यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा : बिनविरोधवरून राजकीय नाट्य; दत्ता पानसरे यांचा आत्महत्येचा इशारा तर भाजपचे कार्यकर्तेही आक्रमक

भंडाऱ्यात रासायनिक भेसळ

नुकतीच खंडोबाचे मुख्य तीर्थक्षेत्र असलेल्या जेजुरी गडावर भंडाऱ्याला अचानक आग लागल्याची एक अत्यंत खळबळजनक घटना घडली होती. या घटनेचा दाखला देत आमदार पाचपुते यांनी भंडाऱ्यातील रासायनिक भेसळीवर बोट ठेवले. केमिकलयुक्त भंडारा शरीरात गेल्याने भाविकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

नक्की पहा : अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय नाट्य; पानसरेंनंतर भाजपही आक्रमक

तुकाराम मुंढे सकारात्मक (FDA)

सध्या अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) ‘भंडारा’ म्हणजे नेमकं काय, याची कोणतीही ठोस किंवा कायदेशीर व्याख्या स्पष्ट नाही. कायद्यात भंडारा म्हणजे ‘हळदच’ असे कुठेही नमूद न केल्याचा गैरफायदा काही ठराविक लोक घेत आहेत. पाचपुते यांनी मांडलेला हा मुद्दा लक्षात घेऊन एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अन्न व औषध प्रशासनातर्फे लवकरच या संदर्भात एक अधिकृत परिपत्रक जारी केले जाण्याची शक्यता आहे.