Bhushan Deshmukh : नगर : काही माणसं अशी असतात की त्यांच्याकडं कुठलं मोठं पद नसलं तरी त्यांच्या व्यक्तीमत्वामुळं आणि कार्यातून ती शहराची ओळख बनतात. त्यांचं अचानक निघून जाणं मग सर्वांच्यात मनाला चटका लावून जातं. जणू आपल्या घरातील कोणी सदस्य गेलाय, अशीच भावना प्रत्येकाची होते. अहिल्यानगरमधील असंच एक व्यक्तीमत्व म्हणजे ज्येष्ठ पत्रकार (Journalist) तथा इतिहासाचे अभ्यासक भूषण देशमुख… भूषण गोपाळ देशमुख (Bhushan Deshmukh) यांचं आज (ता. ६) वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधानानं केवळ अहिल्यानगर शहरचं (Ahilyanagar city) नव्हे तर त्यांच्या कार्यातून ओळख असलेल्या शहरांतील माणसंही हळहळली.
नक्की वाचा : तंबूत शिरून मौल्यवान वस्तूंची चोरी; सकाळी उठताच पर्यटकांच्या ‘डोळ्यासमोर काजवे’

सेवानिवृत्तीनंतर इतिहासाच्या क्षेत्रात वाहून घेतलं
पत्रकारिता, इतिहासाचा अभ्यास, पुस्कांचं लेखन, व्याख्यानं, सामाजिक कार्य अशा किती तरी क्षेत्रात देशमुख यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. मूळचे जामखेडचे असलेले देशमुख नगर शहरात आले. येथे पत्रकाारिता सुरू केली. विविध वृत्तपत्रांत काम करतानाच त्यांना इतिहासाच्या अभ्यासाचीही आवड निर्माण झाली. या विषयावरील पुस्तकं त्यांनी लिहिली. पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचं काम केलं. त्यांच्याकडं शिकलेले किती तरी विद्यार्थी आज पत्रकारितेत काम करीत आहेत. देशमुख यांनी अनेक दशकांच्या आपल्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या कारकिर्दीत नेहमीच तटस्थ, निर्भीड आणि अभ्यासू पत्रकारितेला प्राधान्य दिलं. सेवानिवृत्तीनंतर आपल्या आवडीच्या इतिहासाच्या क्षेत्रात वाहून घेतलं.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

‘नगर परिक्रमा’ आणि ‘डिस्कव्हर अहमदनगर’ अशी त्यांची गाजलेली पुस्तकं (Bhushan Deshmukh)
देशमुख यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या ऐतिहासिक व भौगोलिक वैशिष्ट्यांवर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. ‘नगर दर्शन’, ‘नगर प्रदक्षिणा’, ‘नगर परिक्रमा’ आणि ‘डिस्कव्हर अहमदनगर’ अशी त्यांची पुस्तकं गाजली. इतिहासाचा संदर्भ म्हणून ती उपयोगी ठरतात. इतिहास आणि पर्यटन या विषयांवर व्याख्यानं दिली. रामायण, महाभारतापासून ते नगरच्या भुईकोट किल्ल्यापर्यंतचा इतिहास ते विद्यार्थ्यांसमोर मांडत. इतिहास जगणारा आणि जपणारया या अवलियाने अहिल्यानगरचा ऐतिहासिक दस्तऐवज धूळखात पडलेल्या पानांमधून बाहेर काढून जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. अहिल्यानगरला निजामशाही, आदिलशाही, मोगल आणि मराठा साम्राज्याचा एक मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या इतिहासाची विखुरलेली पाने एकत्र करण्याचे काम त्यांनी केलं.
पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचा वर्तमान सुधारण्याचा प्रयत्न
नगरचा जगप्रसिद्ध भुईकोट किल्ला, चांदबिबी महाल, फराबाग यांसारख्या वास्तूंचा इतिहास असो वा निजामशाहीच्या काळातील राजकारण, यातीव घटनेचा सखोल आणि पुराव्यासहित अभ्यास त्यांच्याकडं होता. भूषण देशमुख म्हणजे एक अत्यंत नम्र, प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहून आपलं कार्य निरंतर चालू ठेवणारं व्यक्तिमत्त्व. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजाचा वर्तमान सुधारण्याचा प्रयत्न केला, तर इतिहास अभ्यासाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला आपल्या भूतकाळाची ओळख करून दिली. मोडी लिपी आणि जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांचं वाचन करून त्यांनी अनेक विस्मरणात गेलेले संदर्भ पुन्हा उजेडात आणले. इतिहास हा कोरडा न मांडता तो रंजक आणि पुराव्यांच्या आधारे कसा मांडावा, याचं उत्तम कसब त्यांच्याकडं होतं.
अहिल्यानगरचा चालताबोलता इतिहास हरपला
अशा या इतिहासाला वाहून घेतलेल्या व्यक्तीमत्वाची अखेरही इतिहासासंबंधीच्या उपक्रमातच झाली, असाही एक योगायोगच. एप्रिल महिन्यात हेरीटेज वॉक या त्यांच्या उपक्रमात ते लष्करी अधिकाऱयांच्या एका गटाला भुईकोट किल्ल्यात फिरून माहिती देत होते. किल्ल्याच्या परिसरात अतंत्य विषारी साप आहेत. याबद्दल देशमुख पर्यटकांना नेहमी सावधगिरीच्या सूचना देत. मात्र, त्या दिवशी त्यांनाच सर्पदंश झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर ते त्यातून बरेही झाले. मात्र, काही काळानंतर त्यांना पुन्हा त्रास झाला. त्यावर उपचार सुरू असताना आज (ता. ६) त्यांची प्राणज्योत मालवली. अहिल्यानगरचा चालताबोलता इतिहास हरपला. इतिहास जगणारे देशमुख यांनी इतिहासाच्या साक्षीनंच जगाचा विरोप घेतला. अहिल्यानगरकरांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.



