Jal Jeevan Mission Scheme : पाण्याच्या प्रश्नाने माळीबाभुळगावकर त्रस्त; ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी

प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी

0
Jal Jeevan Mission Scheme : पाण्याच्या प्रश्नाने माळीबाभुळगावकर त्रस्त; ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी
Jal Jeevan Mission Scheme : पाण्याच्या प्रश्नाने माळीबाभुळगावकर त्रस्त; ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी

Jal Jeevan Mission Scheme : पाथर्डी : शहरालगतच्या माळीबाभुळगाव येथे आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत (Jal Jeevan Mission Scheme) मंजूर झालेल्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या वर्षभरापासून रखडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पाण्याच्या टाकीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असून गावातील नवीन पाईपलाईनच्या (Pipeline) कामालाही अद्याप सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

नक्की वाचा : राज्यात सर्वाधिक आमदारांचा जिल्हा, तरुण आमदारांचा जिल्हा, अहिल्यानगरची राज्यात नवी ओळख

आंदोलन छेडण्याचा इशारा

या पार्श्वभूमीवर माजी सरपंच संदीप वायकर व ग्रामपंचायत सदस्य रुबाब शेख यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदन देत येत्या आठ ते दहा दिवसांत काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.माळीबाभुळगाव हे गाव पाथर्डी शहरालगत असल्याने येथे नागरीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गावाच्या हद्दीलगत विविध व्यावसायिक आस्थापना उभ्या राहिल्या असून शिक्षक कॉलनी, समर्थ नगर, तारकेश्वरनगरी यांसारख्या अनेक वस्त्याही विकसित झाल्या आहेत. परिणामी गावाची लोकसंख्या व पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असताना त्या प्रमाणात मूलभूत सुविधांचा विकास झालेला नाही. विशेषतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

वर्षभरापासून हे काम बंद (Jal Jeevan Mission Scheme)

शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गावासाठी पाण्याची उंच टाकी व पाईपलाईन मंजूर करण्यात आली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत टाकीचे काम सुरूही करण्यात आले; मात्र सुमारे वर्षभरापासून हे काम बंद असून टाकी अर्धवट अवस्थेत उभी आहे. तसेच गावातील नवीन पाईपलाईनच्या कामाला अद्याप प्रारंभ झालेला नाही. याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा संबंधित कार्यालयाशी प्रत्यक्ष भेट घेऊन तसेच दूरध्वनीद्वारे पाठपुरावा केला; मात्र त्याचा कोणताही परिणाम झालेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी

उन्हाळ्याच्या काळात पाण्याची मागणी वाढलेली असताना योजनेच्या कामातील दिरंगाईमुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे गावातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.माजी सरपंच संदीप वायकर आणि ग्रामपंचायत सदस्य रुबाब शेख यांनी दिलेल्या निवेदनात अर्धवट राहिलेल्या पाण्याच्या टाकीचे काम तसेच नवीन पाईपलाईनचे काम येत्या आठ ते दहा दिवसांत प्रत्यक्ष सुरू करावे, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा दिला आहे. निवेदनाच्या प्रती आमदार मोनिका राजळे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.