नगर : महाराष्ट्रात एल निनो वादळाच्या प्रभावामुळे यंदा पाऊस (Monsoon Rain Update) लांबणीवर पडला आहे. पाऊस लांबल्याने (The rains were delayed) पेरण्या देखील लांबल्या आहेत. अर्धा जून महिना संपला तरी अजूनही मौसमी पाऊस महाराष्ट्रभर पसरलेला नाही,असं असतानाच आता राज्य सरकारने पावसाबाबत नवा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज समोर आल्यानंतर आता शेतकरी वर्गात पुन्हा चिंतेचे ढग जमा झाले आहेत.
नक्की वाचा : शिर्डीतील साईबाबांच्या चरणी गतवर्षीच्या तुलनेत कमी दान, देवस्थानच्या एकूण ठेवी किती?
नेमका नवा अंदाज काय? (Monsoon Rain Update)
समोर आलेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत राज्यातील पाऊस आणि पाणीसाठा यावर चर्चा झाली आहे. पाऊस असाच लांबला तर भविष्यात राज्यात मोठं पाणीसंकट निर्माण होऊ शकतं, अशी चिंता बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पावसाबाबत आणखी एक चिंता व्यक्त करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात आणखी तीन दिवस पाऊस पडणार नसल्याचे, मत व्यक्त करण्यात आले आहे. राज्यात २० जूननंतर पाऊस बरसू शकतो,असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
अवश्य वाचा : पावडर दाखवली, भुरळ घातली आणि सोने घेऊन पळाले;पाथर्डीत नेमकं काय घडलं?
राज्यात पाणीबाणी निर्माण होणार? (Monsoon Rain Update)
पाऊस लांबल्याने राज्यभरातील धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. पावसाने आणखी काही दिवस दडी मारली तर हे पाणीसंकट आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाऊस कधी येणार याची सर्वजण वाट पाहात आहेत. पाऊस नसल्याने पाणीबचत करावी, असा सल्ला दिला जात आहे. तसेच मुंबईसारख्या मोठ्या शहरातही आणखी पाणीकपात करण्यावर विचार सुरू झाला आहे.
माहितीनुसार भविष्यात मुंबईत २० टक्क्यांनी पाणीकपात होऊ शकते. सध्या राज्यात २४.४१ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात ३१.१० टक्के जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे पाण्याचे हे संकट आणखी भीषण होते की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे. सध्यातरी चांगल्या पावसाची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करणे टाळावे. सरकारी सूचनांचे पालन करावे. दुबार पेरणीचे संकट येऊ नये यासाठी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.



