Police Investigation : नगर : श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील सीआर क्रमांक ४६३/२६ मधील जप्त करण्यात आलेला गुटखा पुन्हा बाजारात आढळून आल्याचा आरोप झाल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे व इतर कर्मचाऱ्यांवर जप्त मुद्देमाल चोरून विकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, संबंधितांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वराज्य जनजागृती परिषदेचे जिल्हाध्यक्ष टिळक गोपीनाथ भोस यांनी केली आहे.
हेही वाचा : श्रीगोंद्यातील म्हातारपिंपरी येथे मराठाकालीन शिलालेख आढळला; भैरवनाथ मंदिराच्या इतिहासावर प्रकाश
वरिष्ठांना निवेदन
यासंदर्भात पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक परिक्षेत्र) तसेच अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १५ मे २०२६ रोजी बेलवंडी पोलिसांनी छापा टाकून सुमारे ४ लाख ६० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सीआर क्रमांक ४६३/२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, १४ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेने श्रीगोंदा शहरात टाकलेल्या छाप्यात जप्त करण्यात आलेल्या गुटख्याच्या पॅकिंगवर ४६३/२६ असा स्पष्ट उल्लेख आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुन्हा बाजारात कसा पोहोचला, याबाबत गंभीर संशय व्यक्त करण्यात येत आहे.
नक्की पहा : अहिल्यानगरमध्ये तरुणावर कुऱ्हाडीने वार करत हत्या
विभागीय चौकशीची मागणी (Police Investigation)
या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास २६ जून २०२६ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही टिळक भोस यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. भोस यांनी या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली असून, जप्त गुटखा पुन्हा बाजारात कसा आला याची सखोल तपासणी करण्यात यावी, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करून दोषींवर निलंबनासह कठोर कारवाई करावी, तसेच गुटखा चोरीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.



