ADCC Bank | नगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (ADCC Bank) संचालक मंडळाची (व्यवस्थापक समिती) मुदत संपली आहे. त्यामुळे या बँकेची निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राजकीय बळ देणाऱ्या अर्थ संस्थेची निवडणूक जिल्ह्यात नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. अनेक वर्षांपासून या बँकेत थोरात व विखे गटाचे सत्ताकारण चालत आले आहे. या बँकेच्या निवडणूक प्रक्रियेसाठी सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव १७ जून ते १६ जुलै या कालावधीत संस्थांकडून जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संभाजी निकम व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी मागवले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी जिल्ह्याच्या राजकारणात ही निवडणूक महत्त्वाची ठरेल असे कयास राजकीय विश्लेषक लावत आहेत. ऑगस्टमध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता आहे.
हे वाचा – बंदुकीचा धाक दाखवून उबेर चालकाला लुटले; एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडली घटना
विखे गट व थोरात गट यांच्यात सत्ताकारण (ADCC)
जिल्हा सहकारी बँकेच्या इतिहासातील पहिली दहा वर्षे वगळता या बँकेत नेहमीच विखे गट व थोरात गट यांच्यात सत्ताकारण रंगताना पहायला मिळते. दोन्ही गट कोणत्याही पक्षात असले तरी सहकारी बँकेत हे दोन्ही गट परस्पर विरोधी राजकारण करताना दिसून येतात. थोरात गटाला बऱ्याच वेळा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा पाठिंबा मिळतो. तसेच थोरातांचे सोयरे-धायरेही त्यांना राजकीय सहाय्य पुरवितात, असे सांगितले जाते. विखे गट हे आपले अनेक वर्षांचे सहकार व राजकारणातील संघटनाचा वापर करत राजकीय खेळ्या या बँकेच्या निवडणुकांत खेळताना दिसून येतात. तीन वर्षांपूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एका मताने निवडून आणत थोरात गटाला धक्का दिला होता. थोरात गटाकडे पुरेशी संचालक संख्या असतानाही माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना पराभवाचा धक्का बसला होता. भाजपचे नेते तथा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आता आपण जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लक्ष घालणार असे जाहीर केल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत वाढणार आहे. खासदार नीलेश लंके यांच्या भूमिकेकडेही लक्ष राहणार आहे.
अवश्य वाचा – शिंगवेतुकाईतील खतांच्या बोगस कारखान्यावर धाड; २१.८० लाखांचा साठा जप्त
एका मताने मिळाले अध्यक्षपद (ADCC)
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात आली होती. त्यामुळे आधी एक सदस्यीय, तर नंतर तीन सदस्यीय प्रशासकीय मंडळाकडे बँकेचा कारभार आहे. बँकच्या संचालक मंडळाची मुदत संपण्याआधी म्हणजे ऑक्टोबर महिन्यात बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचे निधन झाले होते. त्यांच्या रिक्त जागेवर अक्षय कर्डिले यांची संचालकपदी निवड करण्यात आली होती. तर अध्यक्षपदी चंद्रशेखर घुले यांना बसविण्यात मंत्री विखे पटलांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता निवडणूक प्रक्रिया सुरू होत असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
निवडणुकीत मतदान करण्यासाठी ज्या सहकारी संस्था १ जून २०२३ किंवा त्यापूर्वी बँकेच्या सभासद असतील त्याच पात्र राहणार आहेत. प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था सोडून इतर सहकारी संस्था थकबाकीत असतील, तर अशा संस्था प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार असणार नाही. तथापि, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था जर थकबाकीत असेल, तर अशा संस्थांच्या संचालकांच्या ऐवजी सदर संस्थेच्या थकबाकीदार नसलेल्या एखाद्या सदस्याचा प्रतिनिधी म्हणून समावेश करण्यात करण्याचा ठराव घेता येईल. तसेच ज्या संस्थांच्या बाबतीत ७३ क अ (१) (i) फ (iii) अन्वये कार्यवाही केलेली असल्यास त्या संस्था मतदानासाठी पात्र राहणार नाहीत, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
महिन्याभरात ठराव पाठवा (ADCC)
बँक सभासद संस्थांचे प्रतिनिधींचे ठराव संस्थेचे मुख्यालय असलेल्या जिल्ह्यातील संबंधित उप सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात कार्यालयीन १६ जुलैपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावयाचे आहेत. सभासद संस्थेने १७ जून ते १६ जुलै २०२६ या कालावधीत प्रतिनिधींचे ठराव घेणे आवश्यक आहे. याबाबतचा सविस्तर तपशील सभासद सहकारी संस्थांना कळविला आहे, असे जिल्हा उपनिबंधक यांच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, निवडणुकीसाठी विविध मतदारसंघांतून साडेपाच हजार मतदारांची संख्या राहण्याची शक्यता आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सलग दहा वर्षे संचालक असलेल्या व्यक्तीस संचालक पदाची निवडणूक लढवता येणार नाही, असा नवा नियम यंदापासून लागू होत आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांना निवडणुकीपासून अलिप्त राहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. या नव्या नियमामुळे ‘नव्या दमाचे शूर शिपाई’ बँकेच्या राजकीय आखाड्यात मैदान मारताना दिसून येतील. यातच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आमदार विवेक कोल्हे, विक्रमसिंह पाचपुते, जयश्री थोरात, उदयन गडाख हे निवडणुकीत रिंगणात दिसतील, अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.



