Pune Shirdi Railway : नगर : साई भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुण्याहून शिर्डीला जाण्यासाठी दररोज पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. या मार्गी प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास आता अधिक सोयीचा होणार आहे. केंद्रीय रेल्वे आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज (ता. १७) पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून ही रेल्वे नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
हेही वाचा : श्रीगोंद्यात काळ्या काचा व वाहतूक नियम तोडणाऱ्या ८६ वाहनचालकांवर कारवाई; दीड लाखांचा दंड वसूल
धार्मिक पर्यटनाला चालना
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी याठिकाणी श्री साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. आता पुणे ते शिर्डी ही रेल्वे सुरू झाल्यामुळे भाविकांबरोबरच शिर्डी व परिसरातील नागरिकांना पुण्यातील शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि अन्य महत्त्वाच्या सेवांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार असून, या मार्गामुळे धार्मिक पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.
नक्की पहा : नगर-पुणे रेल्वे अडली कुठं? जनरेटा कमी की, छुपा विरोध भरतोय भारी?
जाणून घ्या थांबे आणि वेळापत्रक (Pune Shirdi Railway)
या एक्सप्रेसला दौंड कॉर्ड लाइन, श्रीगोंदा, अहिल्यानगर, राहुरी आणि बेलापूर येथे थांबे देण्यात आले आहेत. पुणे-साईनगर शिर्डी रेल्वे (क्रमांक 11423) पुणे स्थानकातून सकाळी 6.55 वाजता रवाना होऊन दुपारी 12 वाजता साईनगर शिर्डी येथे पोहोचणार आहे. तर परतीची गाडी क्रमांक 11424 साईनगर शिर्डी येथून सायंकाळी 6.10 वाजता सुटून रात्री 11.55 वाजता पुणे स्थानकात दाखल होईल.



