
Parner Tehsil Office and Police Station : पारनेर : तालुक्यातील प्रशासनाचा कणा मानल्या जाणाऱ्या पारनेर तहसील कार्यालय आणि पोलीस ठाणे (Parner Tehsil Office and Police Station) परिसरातच वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. या दोन्ही महत्त्वाच्या कार्यालयांच्या आवारात बेशिस्त नागरिकांनी अवैधपणे वाहने उभी केल्याने सर्वसामान्य नागरिकांना दररोज मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे पोलीस प्रशासन (Police Administration) शहरात कारवाईचा बडगा उगारत असताना, शासकीय कार्यालयांच्या दारात होणाऱ्या या अतिक्रमणाकडे (Encroachment) मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नाक्की वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या आरोपीचा जामीन फेटाळला
पायी चालणेही कठीण
पारनेर तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात कामानिमित्त तालुक्यातील कानाकोपऱ्यातून शेकडो नागरिक येत असतात. मात्र, या कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर आणि परिसरातच चारचाकी व दुचाकी वाहनांची मोठी गर्दी असते. यामुळे पायी चालणेही कठीण झाले असून, नागरिकांना आपल्या कामासाठी कार्यालयात पोहोचताना तारेवरची कसरत करावी लागते. विशेष म्हणजे, पोलीस प्रशासन आणि वाहतूक शाखेकडून पारनेर बसस्थानक परिसर तसेच सुपा रोडवर बेशिस्त वाहनचालकांवर धडाकेबाज कारवाया केल्या जातात. तेथे ऑनलाईन दंड आकारला जातो. मात्र, हीच शिस्त पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालयाच्या आवारात का पाळली जात नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
दंडात्मक कारवाई करण्याची मागणी (Parner Tehsil Office and Police Station)
शासकीय कार्यालयांच्या आवारात बिनदिक्कतपणे उभ्या असणाऱ्या वाहनांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने, हा ‘दुजाभाव’ का, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगली आहे.शासकीय कार्यालयांच्या समोरच वाहनांचा असा विळखा पडल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेला किंवा इतर महत्त्वाच्या वाहनांना मार्ग काढणे कठीण होत आहे. प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन, तहसील व पोलीस ठाणे परिसर ‘नो पार्किंग’ झोन करावा आणि नियम तोडणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. जर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शासकीय कार्यालयांच्या आवारातच नियमांचे उल्लंघन होत असेल, तर कायदा व सुव्यवस्थेचा संदेश काय जाणार? असा सवाल आता जागरूक नागरिक विचारत आहेत.


