Crime : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी शिवारातील समर्थ हॉटेल परिसरात एका व्यावसायिकाला मारहाण करून त्याच्या वाहनातील तब्बल २ लाख ४७ हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे आष्टी तालुक्यातील नांदा येथील व सध्या पनवेल (जि. रायगड) येथे राहणारे बबन मल्हारी औटी (वय ४५) हे २० जून रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास गव्हाणेवाडी गावच्या शिवारातील समर्थ हॉटेलजवळ लघुशंकेसाठी थांबले होते.
हेही वाचा : घायवळ टोळीतील दोन फरार आरोपी जेरबंद; एलसीबीची धडक कारवाई
फिर्यादीला मारहाण
यावेळी तेथे आलेल्या चार अनोळखी इसमांनी ‘तुम्ही येथे का थांबले?’ अशी विचारणा करत फिर्यादी औटी यांना मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या वाहनातील २ लाख ४७ हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली आणि तेथून पलायन केले.
नक्की पहा : कोणत्या स्वभाव गुणाचे पुरुष असतात ‘बेस्ट लाईफ पार्टनर’?
चौघांवर गुन्हा (Crime)
या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९ (६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर व पोलीस उपनिरीक्षक गाजरे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गाजरे करीत आहेत.



