Vinaykumar Awate : कडधान्य उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक : विनयकुमार आवटे

तणनियंत्रणाच्या शिफारसींचे पालन करण्याचे आवाहन

0
Vinaykumar Awate : कडधान्य उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक : विनयकुमार आवटे
Vinaykumar Awate : कडधान्य उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक : विनयकुमार आवटे

Vinaykumar Awate : पाथर्डी : राज्यात कडधान्य पिकांचे क्षेत्र आणि उत्पादकता वाढविणे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आणि पोषण सुरक्षिततेसह आर्थिक उन्नती साधणे हे राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियानाचे (National Food Security and Nutrition Mission) प्रमुख उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच मूल्यवर्धन व प्रक्रिया उद्योगांकडे वळल्यास त्यांच्या उत्पन्नात (Income) निश्चितच वाढ होईल असे प्रतिपादन कृषी विभागाचे संचालक विनयकुमार आवटे (Vinaykumar Awate) यांनी केले.

तूर प्रात्यक्षिक बियाण्यांचे वाटप

राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान (कडधान्य) योजनेंतर्गत पाथर्डी तालुक्यातील  निवडूंगे येथे चैतन्य ऑरगॅनिक शेतकरी गटाला भेट देऊन त्यांच्या हस्ते तूर प्रात्यक्षिक बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आवटे म्हणाले, तूर, मूग, उडीद आणि हरभरा या कडधान्य पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित वाणांचे बियाणे, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सुधारित वाणांचे बियाणे शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तणनियंत्रणाच्या शिफारसींचे पालन करण्याचे आवाहन (Vinaykumar Awate)

जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) तसेच तणनियंत्रणाच्या शिफारसींचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. विविध कृषी योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी उत्पादनाबरोबरच उत्पन्नवाढीवर भर द्यावा, असेही ते म्हणाले.कार्यक्रमात चैतन्य ऑरगॅनिक शेतकरी गटातील सदस्यांना तूर प्रात्यक्षिक बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या तसेच कडधान्य लागवड, उत्पादनवाढ आणि शाश्वत शेतीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

दुग्ध प्रक्रिया उद्योगाला भेट

यानंतर कृषी संचालक आवटे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग  योजनेअंतर्गत तिसगाव येथील बाळासाहेब तुकाराम लवांडे यांच्या दुग्ध प्रक्रिया उद्योगाला भेट देऊन पाहणी केली. तसेच करंजी मंडळातील देवराई येथे निलेश प्रल्हाद पालवे यांनी उभारलेल्या आधुनिक खवा प्रक्रिया उद्योग केंद्रालाही भेट दिली. कच्च्या मालाच्या उत्पादनाबरोबरच प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतमालाला अधिक मूल्य मिळते, ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होते आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होते, असे त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित

या दौऱ्याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे, मंडळ कृषी अधिकारी वैभव थोरे, कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) सुनील देखणे, उपकृषी अधिकारी संतोष उगार, विशाल साबदे, युसुफ तडवी, सहाय्यक कृषी अधिकारी भागवत शिरसाट, अभिजित गोरे उपस्थित होते. तसेच प्रगतशील शेतकरी उमेश मरकड, अमोल चिकणे, विकास यांच्यासह चैतन्य ऑरगॅनिक शेतकरी गटाचे सदस्य व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत आयोजित बियाणे वाटप, शेतकरी मार्गदर्शन आणि प्रक्रिया उद्योगांच्या पाहणीमुळे उत्पादनवाढीसह मूल्यवर्धनाची दिशा शेतकऱ्यांना यातून मिळेल.