PMFBY : नगर : राज्यात सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून चालू खरीप हंगामात सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी झाल्यास नुकसान भरपाई मिळणार आहे. हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांच्या आर्थिक संरक्षणासाठी ही योजना महत्त्वाची असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पूर्वी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे संचालक विनयकुमार आवटे यांनी केले आहे. खरीप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा या १४ पिकांसाठी योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के हप्ता भरावा लागणार असून कापूस व कांदा या नगदी पिकांसाठी पाच टक्के हप्ता आकारला जाणार आहे.
नक्की वाचा : जुन्या वादातून तरुणावर तलवारीने हल्ला; श्रीगोंदा येथील घटना
ऑनलाइन अर्ज करता येणार (PMFBY)
योजनेत सहभागी होण्यासाठी किमान ०.१० हेक्टर क्षेत्रावर पीक असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर बँक, सामूहिक सेवा केंद्र किंवा स्वतः ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्जासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, जमिनीची कागदपत्रे, पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक व आधारशी संलग्न बँक खाते आवश्यक आहे. तसेच डिजिटल क्रॉप सर्वेअंतर्गत पिकाची नोंद करणे बंधनकारक असून त्यातील नोंद व विमा अर्जातील पिकामध्ये तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द करण्यात येईल. चुकीच्या मार्गाने अर्ज करून गैरफायदा घेतल्याचे आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे कृषी विषयक योजनांचा लाभ मिळणार नाही.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
टोल फ्री क्रमांक (PMFBY)
कर्जदार शेतकऱ्यांनी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेत सहभागी व्हावे. योजनेत सहभागी होण्याची इच्छा नसल्यास विहित मुदतीत बँकेला लेखी कळविणे आवश्यक आहे. सामूहिक सेवा केंद्र चालकाला विमा कंपनीकडून प्रति अर्ज ६० रुपये मानधन दिले जात असल्याने शेतकऱ्यांनी विमा हप्त्याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जवळील बँक किंवा १४४४७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.



