Ladki Bahin Yojana : नगर : ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण न करणे, उत्पन्नाची मर्यादा आणि इतर पात्रता निकषांमधील त्रुटींमुळे राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून तब्बल 92 लाख महिलांना वगळण्यात आले आहे. या पडताळणीनंतर आता 1.5 कोटींहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. ई-केवायसी पूर्ण न करणे, उत्पन्नाची मर्यादा ओलांडणे, वयोमर्यादा आणि इतर पात्रतेच्या निकषांमुळे ही नावे वगळण्यात आल्याची माहिती सरकारी आकडेवारीतून समोर आली आहे.
नक्की वाचा : जुन्या वादातून तरुणावर तलवारीने हल्ला; श्रीगोंदा येथील घटना
सरकारी कर्मचारीही लाभार्थी
सरकारी माहितीनुसार, 61 ते 62 लाख महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ई-केवायसीनंतर सुमारे 10 लाख लाभार्थींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्याचे आढळले. तसेच 4.5 लाख लाभार्थींचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक, तर 2 ते 2.5 लाख लाभार्थ्यांकडे चारचाकी वाहन असल्याचे त्यांनी ई-केवायसीदरम्यान नमूद केले. याशिवाय 14 हजार प्रकरणांमध्ये पुरुषांनी महिलांच्या नावाने योजनेचा लाभ घेतल्याचे, तर सुमारे 2 हजार लाभार्थी प्रत्यक्षात पुरुष असल्याचे पडताळणीत समोर आले. तसेच 4 लाख 40 हजार सरकारी कर्मचारीही या योजनेचे लाभार्थी असल्याचे आढळून आले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
फेरपडताळणी प्रक्रिया सुरूच (Ladki Bahin Yojana)
दरम्यान, महिलांच्या नावाने लाभ घेतलेल्या 16 हजार पुरुषांकडून सरकारी चलनाद्वारे योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम वसूल करण्यात येणार आहे. याशिवाय, सुमारे 12 लाख महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे पडताळणीत आढळले. साधारण 5 लाख महिला ‘नमो शेतकरी’ योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले. सरकारने स्पष्ट केले आहे की, लाभार्थ्यांची फेरपडताळणी प्रक्रिया अद्याप सुरू असून अंतिम लाभार्थी संख्या त्यानंतर निश्चित होणार आहे. तसेच, चुकीने नाव वगळण्यात आल्याची तक्रार करणाऱ्या लाभार्थ्यांच्या अर्जांचीही छाननी केली जात आहे.



