Sri Sai Sachcharitra Parayan : राहाता : “संत हे साक्षात भगवंताचे स्वरूप आहेत. शिर्डीचे श्री साईबाबा (Shri Sai Baba) हे केवळ संत नव्हे, तर परमेश्वराचेच प्रतिरूप आहेत. श्री साईंबद्दल आपल्या अंतःकरणात असलेली श्रद्धा आणि भक्ती अढळ ठेवावी. त्यांच्या विषयी कोणीही काहीही वक्तव्य केले, तरी त्याकडे दुर्लक्ष करून साईभक्तीचा आनंद घ्यावा,” असे प्रतिपादन महेंद्रजी महाराज नलावडे (Mahendraji Maharaj Nalavde) (आळंदी) यांनी केले.
नक्की वाचा : पारनेर तालुक्यात युरिया खताचा तुटवडा, शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण

श्री साईबाबांच्या विविध लीलांचे रसाळ वर्णन
राहाता येथील श्री साई स्नेहबंध ग्रुपच्या वतीने श्री साई दत्त मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या सलग २५ व्या रौप्यमहोत्सवी श्री साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याच्या सांगता समारंभानिमित्त आयोजित प्रवचनात ते बोलत होते. महेंद्र महाराजांनी आपल्या प्रवचनात श्री साईबाबांच्या विविध लीलांचे रसाळ वर्णन करत अध्यात्मातील अनेक दाखल्यांद्वारे उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. त्यांनी ‘श्री साई सतचरित्र’ हेच ग्रंथाचे मूळ नाव असल्याचे सांगत, ‘संत’ म्हणजे ज्याला जन्म-मृत्यू नाही, ते चिरंतन, आनंदस्वरूप आणि परम सत्य आहे, असे स्पष्ट केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मंत्रोच्चारात ग्रंथपूजन (Sri Sai Sachcharitra Parayan)
भगवंतांपेक्षाही संतांचा अधिकार मोठा असून संतांची निंदा भगवंतांनाही सहन होत नाही. संतचरित्राचे श्रद्धेने वाचन केल्याने गंगास्नानाइतके पुण्य लाभते. तसेच पारायण करणाऱ्यांसह त्याचे श्रवण करणाऱ्यांनाही पुण्यप्राप्ती होते, असे त्यांनी सांगितले. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या पारायण सोहळ्याच्या प्रारंभी व सांगता दिनी वेदशास्त्रसंपन्न अनंतशास्त्री लावर गुरुजी यांच्या हस्ते मंत्रोच्चारात ग्रंथपूजन करण्यात आले. विठ्ठलराव कातोरे व महेश बाविस्कर यांनी व्यासपीठ संचालनाची जबाबदारी पार पाडली. या सात दिवसीय सोहळ्यात महिला-पुरुष भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.सांगता दिनी श्री साई रथातून शहरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. साईनामाच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री साई दत्त मंदिराचे अध्यक्ष ॲड. दीपक गांधी, पांडुरंग भातोडे, अनिल जोशी, संतोष कुलकर्णी तसेच श्री साई स्नेहबंध ग्रुपचे शंकरराव बाबर, बाळासाहेब सोनटक्के, रामकृष्ण लोंढे, दत्तात्रय कुलकर्णी, पंकज बागरेचा, अरविंद निसळ, निवृत्ती बनकर, भाऊसाहेब चौधरी, ज्ञानेश्वर सोमवंशी, बबनराव लुटे, चंद्रभान मेहत्रे, हरीभाई केयाल, ज्ञानेश्वर गाडेकर, बाळासाहेब कारले, राम परदेशी, नितीन बोठे, साहेबराव कुदळे, राजू महाराज आचारी, निवृत्ती धूमसे, दीपक सापिके आदींनी परिश्रम घेतले.



