Urea fertilizer : पारनेर : सध्या खरीप हंगाम जोमात सुरू असतानाच पारनेर तालुक्यात युरिया खताचा (Urea fertilizer) गंभीर व तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन पिकांच्या (crops) वाढीच्या काळात खत मिळत नसल्यामुळे तालुक्यातील बळीराजा हवालदिल झाला असून, कृषी केंद्रांसमोर (Agricultural centers) शेतकऱ्यांना पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. दिवसभर ताटकळत उभे राहूनही खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नक्की वाचा : मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांच्या पहिल्या शपथविधीला 48 वर्षे पूर्ण; लेकीने शेअर केले फोटो
काही ठिकाणी जास्त दराने खतांची विक्री
युरियाच्या या कृत्रिम किंवा वास्तविक टंचाईचा गैरफायदा काही अकार्यक्षम व नफेखोर कृषी केंद्रांकडून घेतला जात असल्याची चर्चा आहे. खतासोबत इतर अनावश्यक औषधे किंवा खते घेण्याची सक्ती (लिंकिंग) केली जात असून, काही ठिकाणी जास्त दराने विक्री होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या गंभीर समस्येची दखल घेत निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रवींद्र राजदेव यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ एक सविस्तर निवेदन सादर केले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
निवेदनात म्हटले आहे की (Urea fertilizer)
निवेदनात म्हटले आहे की, पिकांच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यात युरियाची नितांत आवश्यकता आहे, परंतु प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या,पारनेर तालुक्यासाठी तात्काळ अतिरिक्त युरिया खताचा कोटा मंजूर करून पुरवठा सुरळीत करावा. कृषी केंद्रांवरील होणारी गर्दी टाळण्यासाठी सोसायट्या आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून युरियाचे न्याय्य वाटप करावे. चढ्या दराने खत विकणाऱ्या आणि निषिद्ध लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी.
आंदोलनाचा इशरा
प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता आगामी दोन ते तीन दिवसांत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा निलेश लंके प्रतिष्ठान व पारनेर तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा रवींद्र राजदेव यांनी दिला आहे. खरीप हंगामातील पिके हातातोंडाशी आलेली असताना खताविना ती सुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने तातडीने हस्तक्षेप करून युरियाचा पुरवठा पूर्ववत करावा आणि शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाचवावा, अशी आर्त हाक पारनेर तालुक्यातील हतबल शेतकरी देत आहेत.



