NCMC Smart Card : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST Bus) बसमधील प्रवास सवलतींसाठी NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने आणखी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. यामुळे आता 1 सप्टेंबर 2026 पर्यंत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच शासनाच्या प्रवासी सवलतींचा लाभ घेता येणार आहे. परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ही माहिती दिली.
पात्र प्रवासी सवलतींपासून वंचित नसणार (NCMC Smart Card)
यापूर्वी सरकारने 1 ऑगस्टपासून एसटी प्रवासातील विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यभरातील मोठ्या संख्येने पात्र प्रवाशांनी अर्ज करूनही त्यांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे केवळ कार्ड वितरणातील विलंबामुळे कोणताही पात्र प्रवासी सवलतीपासून वंचित राहू नये, या उद्देशाने सरकारने निर्णयाचा फेरविचार करत मुदत वाढवली आहे. राज्य सरकारकडून अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के भाडे सवलत दिली जाते. या योजनांचा लाभ अधिक पारदर्शक, तंत्रज्ञानाधारित आणि सुलभ पद्धतीने देण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड प्रणाली लागू करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीपूर्वी अनेक प्रवाशांना कार्ड उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आल्याने सरकारने प्रवाशांच्या अडचणीची दखल घेतली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
NCMC स्मार्ट कार्डसाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली (NCMC Smart Card)
याबाबत बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “एसटीच्या सवलती या सर्वसामान्यांच्या हितासाठी आहेत. तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणांमुळे कोणत्याही पात्र प्रवाशाची गैरसोय होऊ नये, ही सरकारची भूमिका आहे. त्यामुळे NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.” या निर्णयामुळे अद्याप स्मार्ट कार्ड न मिळालेल्या हजारो महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर वाढीव कालावधीत सर्व पात्र प्रवाशांनी आवश्यक कागदपत्रांसह NCMC स्मार्ट कार्डची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहनही परिवहन विभागाने केले आहे.
हे वाचा: “अमित शहांनीच विद्यार्थ्यांवर पॅलेटगन चालवण्याचा आदेश दिला”-राहुल गांधी
दरम्यान, राज्यातील विविध एसटी आगारांमध्ये आणि शहरांतील कार्ड नोंदणी केंद्रांवर गेल्या काही दिवसांपासून मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागत असून काही ठिकाणी कार्डासाठी जादा शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी सरकारने ही मुदतवाढ दिल्याचे सांगितले जात आहे.
नक्की वाचा: मनोज जरांगेंनी मोठा निर्णय घेतला; 29 ऑगस्टला मराठा आरक्षणाचं शेवटचं आंंदोलन
आता 1 सप्टेंबरपर्यंत प्रवाशांना NCMC स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार असून, त्यानंतर एसटी प्रवासातील शासनाच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड अनिवार्य होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पात्र प्रवाशांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर स्मार्ट कार्डची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अवश्य वाचा: बारामती येथील राज्यस्तरीय स्केटिंग मॅरेथॉनमध्ये अहिल्यानगर जिल्हा प्रथम; पटकावली ६ फुटांची मानाची ट्रॉफी



