Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा विषय गेल्या कित्येक महिन्यापासून रखडला आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आता पुन्हा एकदा शेवटेचा लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) शेवटचं आंंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 29 ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या लढ्याला 3 वर्ष पुर्ण होत आहेत. त्यामुळे 29 ऑगस्ट रोजी पुन्हा शेवटचं आणि निर्णायक आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी मराठा समाजाला आणि राज्य सरकारला दिला आहे.
राज्यभरात निर्णायक आंदोलन छेडण्याची घोषणा (Maratha Reservation)
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत 29 ऑगस्टपासून राज्यभरात निर्णायक आंदोलन छेडण्याची घोषणा केली. गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाजाच्या न्यायासाठी सातत्याने संघर्ष करत असल्याचे सांगत, आता हा लढा अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “समाजातील लेकरांचे हाल होत आहेत. त्यांच्या भवितव्यासाठी आम्ही रक्त आटवले आहे. त्यामुळे आता शेवटचे आणि निर्णायक आंदोलन करणार असून, एकाही मराठा बांधवाने घरी थांबायचे नाही,” असे आवाहन त्यांनी केले.
सरकार नेमके मराठ्यांनाच लक्ष्य का करत आहे? (Maratha Reservation)
मराठा समाजाच्या 58 लाख नोंदी उपलब्ध झाल्या असून, त्या आधारे पात्रांना तातडीने जात प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी केली. “सरकारने हैदराबाद गॅझेट मान्य केले, मग त्या आधारे प्रमाणपत्र का दिले जात नाही? नोंदी असूनही मराठा समाजातील तरुणांना प्रमाणपत्रासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. सरकार नेमके मराठ्यांनाच लक्ष्य का करत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 28 ऑगस्टपर्यंत हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रे देण्यात यावीत, अन्यथा 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू होईल, असा अल्टिमेटम त्यांनी राज्य सरकारला दिला.
हेही वाचा: कर्जमाफीच्या ई-केवायसीसाठी शुल्क आकारू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश
तीन-चार महिने उलटून गेले, प्रमाणपत्र मिळेना (Maratha Reservation)
यावेळी त्यांनी सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे संस्थानांच्या गॅझेटीयरलाही मान्यता देण्याची मागणी केली. सरकार केवळ समित्यांच्या बैठका घेत असून प्रत्यक्ष निर्णय घेत नसल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, “तीन-चार महिने उलटून गेले, तरी अनेक पात्र शेतकरी आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाही. सरकारच्या श्रेयवादाच्या राजकारणात मराठा समाजाचा बळी जात आहे.”
जीआर काढून ओबीसीप्रमाणे सुविधा मिळत नाही
जरांगे यांनी मराठा समाजासाठी जाहीर करण्यात आलेल्या ओबीसी धर्तीवरील सवलतींच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सरकारने जीआर काढून ओबीसीप्रमाणे सुविधा लागू केल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना त्या सुविधांचा लाभ मिळत नाही. एसीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचणी येत आहेत. तसेच महाविद्यालयांमध्ये आवश्यक पर्यायच उपलब्ध नाहीत. मग विद्यार्थ्यांनी प्रवेश कसा घ्यायचा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांवरही त्यांनी टीका केली. अनेक तरुणांची कर्जप्रकरणे मंजूर होऊनही अनुदान अथवा परतावा मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सारथी संस्थेच्या अनेक योजना प्रत्यक्षात बंद असल्याचा दावा करत, त्या तातडीने सुरू करण्याची मागणी केली. मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी पुन्हा एकदा करत, “मुख्यमंत्र्यांसाठी हा 15 मिनिटांचा निर्णय आहे. मग स्वतंत्र मराठा मंत्रालय स्थापन करण्यात अडचण काय?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली. “आमच्यावर गुन्हे दाखल करून आता ते मागे घेण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र जोपर्यंत सर्व गुन्हे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असे ते म्हणाले.
फडणवीस साहेब, मराठ्यांवरच अन्याय का?
देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी थेट टीका केली. “फडणवीस साहेब, मराठ्यांवरच अन्याय का? सरकारने घेतलेल्या निर्णयांचा फायदा समाजापर्यंत पोहोचत नाही. अधिकारी सरकारला चुकीची माहिती देत आहेत की सरकार अधिकाऱ्यांची दिशाभूल करत आहे, हेच समजत नाही. मराठा समाजाचा संयम संपत चालला आहे. आम्हाला वारंवार गृहीत धरू नका,” असा इशारा त्यांनी दिला.
नक्की वाचा: खरीप पीक स्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
शेवटी 29 ऑगस्टच्या आंदोलनात मराठा समाजाच्या कोणत्याही मागणीवर तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत, “सरकार कुणाच्याही नेतृत्वाखाली असो, आमच्या समाजाच्या मुलांना न्याय मिळालाच पाहिजे. 28 ऑगस्टपर्यंत सर्व मागण्यांवर निर्णय झाला नाही, तर 29 ऑगस्टपासून सुरू होणारे आंदोलन निर्णायक ठरेल, हे शेवटचं आंदोलन, तुकडाच पाडायचा, एकतर ते जातील नाहीतर मी जाईल” असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.



