Rickshaw-Taxi Fare Hike : १ सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ;नेमकी किती भाडेवाढ होणार?

0
Rickshaw-Taxi Fare Hike : १ सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ;नेमकी किती भाडेवाढ होणार?
Rickshaw-Taxi Fare Hike : १ सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ;नेमकी किती भाडेवाढ होणार?

नगर : आता तुम्ही रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करत असाल तर तुमच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. कारण येत्या १ सप्टेंबरपासून (September 1)रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होणार (Rickshaw-Taxi Fare Hike) आहे. परिवहन आयुक्तांनी सादर केलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (MMRTA) ही मंजुरी दिली आहे. मुंबईसह एमएमआर रिजन मध्ये पुढील महिन्यापासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीमध्ये ही भाडेवाढ होईल.आता ही भाडेवाढ कुठे आणि का होणार ते सविस्तर जाणून घ्या…

नक्की वाचा : साखरेच्या दरात एवढी वाढ का झाली? कारणे नेमकी काय?

नव्या दरानुसार, रिक्षाच्या किमान भाड्यात १ रुपयांची, तर काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या किमान भाड्यात २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सध्या रिक्षासाठी पहिल्या दीड किलोमीटरचे किमान भाडे २६ रुपये आहे. १ सप्टेंबरपासून हे भाडे २७ रुपये होईल. त्याचप्रमाणे काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये करण्यात आले आहे.

अवश्य वाचा : पुण्यात भोंदूबाबाचा पर्दाफाश! तरुणींकडे मागवायचा अश्लील फोटो

भाडेवाढ नेमकी कुठे? (Rickshaw-Taxi Fare Hike)

२० ऑगस्टला या संबंधीचा परिवहन आयुक्तांनी पाठवलेला प्रस्ताव MMRTA ने मंजूर केला असून एक सप्टेंबरपासून मुंबई ठाणे नवी मुंबई, कल्याण, वसई, विरार, पालघर या सगळ्या भागासाठी ही भाडेवाढ निश्चित करण्यात आली आहे. याआधी फेब्रुवारी २०२५ मध्ये भाडेवाढ करण्यात आली होती. हा प्रस्ताव मुंबई रिक्षा-टॅक्सी युनियन्सनी मांडलेल्या मुद्द्यांवर आधारित आहे. यामध्ये इंधन, वाहनांची देखभाल-दुरुस्ती, विमा हप्ते आणि परवाना-संबंधित खर्च यांसारख्या वाढत्या ऑपरेटिंग खर्चाचा उल्लेख करण्यात आलाय.

भाडेवाढीमागे कारण काय? (Rickshaw-Taxi Fare Hike)

रिक्षा आणि टॅक्सी संघटनांकडून गेल्या काही काळापासून भाडेवाढीची मागणी करण्यात येत होती. इंधनाच्या किमती, वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती, विमा हप्ते तसेच परवाना आणि इतर ऑपरेटिंगच्या खर्चात वाढ झाल्याचा मुद्दा रिक्षाचालक संघटनांनी मांडला होता. वाढत्या खर्चाच्या तुलनेत चालकांचे उत्पन्न पुरेसे नसल्याने भाडेवाढ आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे प्रवासी हक्क कार्यकर्ते आणि काही संघटना या वाढीला विरोध करत आहेत. त्यांच्या म्हणण्यांनुसार, मध्यमवर्गीय कुटुंबांवर घरे, अन्न,शिक्षण, आरोग्य शिवाय वाहतुकीचा खर्च हा आधीच वाढला आहे. आता मुंबईत जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर नागरिक रोजच्या प्रवासासाठी लोकल ट्रेन, बस, मेट्रोसह ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचा वापर करतात. विशेषतः रेल्वे स्थानकांपासून घरापर्यंतच्या ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी रिक्षा हा अत्यंत महत्त्वाचा पर्याय आहे. त्यामुळे किमान भाड्यात किंवा प्रति किलोमीटरच्या दरात वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांवर होणार आहे.

रुग्णालय, कार्यालय, बाजारपेठ आणि रेल्वे स्थानकांपर्यंत जाण्यासाठी ऑटो-टॅक्सीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांचा मासिक प्रवास खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुन्हा भाडेवाढ मंजूर झाल्याने नागरिकांच्या बजेटवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबईत होणारी भाडेवाढ पाहता ही भाडेवाढ राज्यातील अजून कोणकोणत्या ठिकाणी होणार हे पाहावे लागणार आहे.