Dimbhe-Manikdoh Tunnel : डिंभे–माणिकडोह बोगद्याला मंजुरी; अहिल्यानगरसह ३ जिल्ह्यांतील शेतीचा पाणीप्रश्न सुटणार

0
Dimbhe-Manikdoh Tunnel : डिंभे–माणिकडोह बोगद्याला मंजुरी; अहिल्यानगरसह ३ जिल्ह्यांतील शेतीचा पाणीप्रश्न सुटणार
Dimbhe-Manikdoh Tunnel : डिंभे–माणिकडोह बोगद्याला मंजुरी; अहिल्यानगरसह ३ जिल्ह्यांतील शेतीचा पाणीप्रश्न सुटणार

नगर : कुकडी प्रकल्पाच्या (Kukadi Project) लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डिंभे ते माणिकडोह (Dimbhe-Manikdoh Tunnel) धरणांना जोडणाऱ्या १६ किलोमीटरच्या बोगद्याच्या प्रकल्पाला राज्य सरकारने अखेर मंजुरी (State Government’s approval) दिली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी ५,७०४.५० कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला सुद्धा मान्यता देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे कुकडी प्रकल्पातून १,४४,९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, अहिल्यानगरसह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दक्षिण अहिल्यानगरचा दुष्काळी पट्टा दुष्काळमुक्त होण्यासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

नक्की वाचा : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; तपासणीस दिला नकार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिंभे –माणिकडोह बोगद्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला. हा प्रश्न मार्गी लागल्याने कुकडीच्या डाव्या कालव्यावरील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न अधिक भक्कम होणार आहे.

१६ किलोमीटरचा बोगदा;अतिरिक्त पाणी माणिकडोह धरणात साठणार (Dimbhe-Manikdoh Tunnel)

डिंभे आणि माणिकडोह ही दोन्ही धरणे कुकडी धरण मालिकेतील महत्त्वाची धरणे आहेत. माणिकडोह धरणाची क्षमता जर आपण पाहिली तर १०.५ टीएमसी आहे. मात्र, पावसाच्या पाण्यावर हे धरण अपेक्षित प्रमाणात भरत नाही. दुसरीकडे, डिंभे धरण आणि त्याखालील घोड धरण भरल्यानंतर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी खालच्या भागाकडे वाहून जाते.

अवश्य वाचा : डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टवर मनोज जरांगेंनीच व्यक्त केली शंका; नेमकं काय घडलं?

या पार्श्वभूमीवर डिंबे धरणातून उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याद्वारे माणिकडोह धरणात वळविण्याची संकल्पना आहे. त्यामुळे पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा अजून प्रभावी वापर करता येणार असून, माणिकडोह धरणाची साठवण क्षमता पूर्णपणे उपयोगात आणण्यास मदत होणार आहे. माणिकडोह धरणातील पाण्याचा मुख्य उपयोग हा कुकडीचा डावा कालवा आणि त्याखालील लाभक्षेत्रातील शेतीसाठी होणार असल्याने या प्रकल्पाचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे.

पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लाभ (Dimbhe-Manikdoh Tunnel)

कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला ५,७०४.५० कोटी रुपयांची मान्यता मिळाल्याने प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेला मोठे बळ मिळणार आहे. या माध्यमातून १,४४,९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असून, पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होईल. कुकडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा व कर्जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला नियमित पाण्याचा आधार मिळाल्यास पीक पद्धतीत बदल होण्याबरोबरच शेती उत्पादन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. दक्षिण अहिल्यानगरच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न हा अनेक वर्षांपासूनचा विषय आहे. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर, पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी अडविणे आणि ते दुष्काळी भागाकडे वळविणे या दृष्टीने डिंबे–माणिकडोह बोगदा अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचं डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे.