District Bank : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राम शिंदेंनी कसली कंबर; कोणाचा जाणार राजकीय बळी?

जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी-गाठीवर जोर

0
District Bank : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राम शिंदेंनी कसली कंबर; कोणाचा जाणार राजकीय बळी?
District Bank : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राम शिंदेंनी कसली कंबर; कोणाचा जाणार राजकीय बळी?

District Bank : कर्जत : जिल्हा सहकारी बँकेच्या (District Cooperative Bank) वार्षिक अहवालात आपला फोटो प्रसिद्ध न झाल्याची सल विधान परिषदेची सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी प्रत्यक्ष बँकेच्या कार्यक्रमातच उघड बोलून दाखवली होती. त्याचवेळी त्यांनी आजपर्यंत बँकेच्या राजकारणात आपण कधी लक्ष घातले नाही. मात्र असा प्रकार घडत असेल तर आता लक्ष द्यावे लागेल असा इशारा देखील त्यावेळी दिला होता. तो इशारा राम शिंदेंनी पाळत यंदाच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Election) आपल्या नावाचे ठराव घेत आता होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी कंबर कसली. कर्जत आणि जामखेड तालुक्यातील जिल्हा बँकेचे मतदार सहलीवर देखील रवाना केले. मात्र या शब्दाखाली कोणत्या स्थानिक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा राजकीय बळी जाणार आहे ? हे पाहावे लागणार आहे.

नक्की वाचा : दिलीप खेडकर यांच्या भालगावातील घरावर एसीबीचा छापा; १३.३० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचा ठपका

फोटो न छापल्याची सल

सहकार क्षेत्रातील अहिल्यानगर जिल्हा बँक कायम राज्य आणि नगर जिल्ह्याच्या राजकारणात मोलाची भूमिका बजावते. लोकसभा-विधानसभा निवडणुकीत नाराज असलेल्या नेत्यांसाठी बँकेची निवडणूक पर्वणी ठरते. यात सहकार क्षेत्रातील योगदान आणि त्याचा गाढा अभ्यास असणे आवश्यक असते. मागील जिल्हा बँकेच्या वार्षिक अहवालात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा फोटो प्रसिध्द न झाल्याने कर्जत-जामखेडमध्ये भाजपाने तीव्र निषेध व्यक्त केला होता. हाच धागा पकडत जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत राम शिंदेंनी व्यासपीठावरील तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ तसेच प्रशासनास कोपरखळी मारत आपल्या मनातील सल व्यक्त केली होती. तसेच फोटो न छापल्याची सल बोलून दाखवत आता आपणांस जिल्हा बँकेच्या राजकारणात लक्ष घालावे लागेल असा गर्भित इशारा देखील दिला होता.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी-गाठीवर जोर (District Bank)

त्याच अनुषंगाने यंदाच्या जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदे यांनी कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यात आपल्या नावाचे ठराव करून घेतले. नुसतेच ठराव न घेता जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी-गाठीवर जोर देत अप्रत्यक्ष विखे पिता-पुत्रांना देखील डीवचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.  जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राम शिंदें कर्जत-जामखेड तालुक्यातील मतदारांची बैठक घेत त्यांना सहलीवर देखील रवाना केले आहे.

 राम शिंदे कर्जतमधून अर्ज दाखल करणार की ? जामखेडमधून हा प्रश्न अनुत्तरित असला तरी जिल्हा बँकेचा संचालक होण्यासाठी ते कोणत्या स्थानिक नेत्याचा किंवा कार्यकर्त्यांचा बळी घेणार हे लवकरच समजेल. सध्या राम शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या दृष्टीने सुरक्षित पावले उचलली असली तरी कर्जत-जामखेड तालुक्यातील विखे समर्थक, थोरात समर्थक आणि राजकीय विरोधक असलेले आमदार रोहित पवार यांनी एकत्रित मोट बांधत त्यांच्या विरोधात तगडे आव्हान उभे केल्यास वावगे वाटणार नाही. त्यामुळे दसरा-दिवाळीच्या अगोदरच निवडणुकीची रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपाची फटकेबाजी पहावयास मिळेल.