Water Scarcity : चार लाख लिटर पाणी मंजूर मात्र, प्रत्यक्ष पुरवठा अडीच लाख लिटरच; पारनेरमध्ये तीव्र पाणीटंचाई

ठेकेदाराच्या मनमानीमुळे नगरपंचायत अडचणीत; सुपा एमआयडीसीतून पाणी भरण्याची नगराध्यक्षांची मागणी

0
Water Scarcity : चार लाख लिटर पाणी मंजूर मात्र, प्रत्यक्ष पुरवठा अडीच लाख लिटरच; पारनेरमध्ये तीव्र पाणीटंचाई
Water Scarcity : चार लाख लिटर पाणी मंजूर मात्र, प्रत्यक्ष पुरवठा अडीच लाख लिटरच; पारनेरमध्ये तीव्र पाणीटंचाई

Water Scarcity : पारनेर : शहरात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असताना, दररोज चार लाख लिटर पाणीपुरवठ्यासाठी (Water Supply) मंजूर खेपा असतानाही प्रत्यक्षात केवळ अडीच लाख लिटरच पाण्याचा पुरवठा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देताना पारनेर नगरपंचायत (Parner Nagar Panchayat) प्रशासनाची मोठी अडचण होत आहे. मंजूर पाणीपुरवठा आणि प्रत्यक्ष होणारा पुरवठा यामध्ये मोठी तफावत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, पाणीटंचाईचे (Water Scarcity) गांभीर्य प्रशासनाने लक्षात घ्यावे, अशी मागणी होत आहे.

पारनेर शहरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी नगरपंचायतीमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी दररोज चार लाख लिटर पाणीपुरवठ्याच्या खेपा मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराकडून प्रत्यक्षात केवळ अडीच लाख लिटर पाण्याचाच पुरवठा केला जात असल्याचा आरोप होत आहे. परिणामी, शहरातील सर्व भागांत नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणी पोहोचवणे नगरपंचायतीसमोर आव्हान ठरत आहे.

नक्की वाचा : कामावरुन घरी परतणाऱ्या मयूरचा निर्घृण खून; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना

मंजूर खेपांनुसार पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नगरपंचायत प्रशासन, नगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा सभापती यांच्या सूचनांकडे संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याची तक्रार व्यक्त केली जात आहे. ठेकेदाराकडून अपेक्षित पाणीपुरवठा होत नसल्यास त्याची कारणे तपासून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पाण्यासारख्या अत्यावश्यक सुविधेच्या बाबतीत होणाऱ्या दिरंगाईमुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.दरम्यान, शहरातील पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी पारनेर नगरपंचायतीच्या टँकरना सुपा एमआयडीसीतून पाणी भरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा (Water Scarcity)

सुपा एमआयडीसी परिसरात टँकरसाठी स्वतंत्र पाणी भरण्याचे ठिकाण निश्चित करावे आणि पाणीटंचाईच्या काळात नगरपंचायतीच्या टँकरला नियमितपणे व प्राधान्याने पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक आदेश देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. सुपा एमआयडीसीतून पाणी उपलब्ध झाल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होईल आणि नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, असे आवाहन डॉ. कावरे यांनी केले आहे.या निवेदनाची प्रत माहितीसाठी जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांना, तर पुढील कार्यवाहीसाठी पारनेर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. 

दरम्यान, मंजूर चार लाख लिटर पाण्याच्या तुलनेत प्रत्यक्ष पुरवठा कमी होत असल्याच्या तक्रारींची प्रशासनाकडून तपासणी होणार का, संबंधित ठेकेदारावर काय कारवाई होणार आणि सुपा एमआयडीसीतून पाणी भरण्याची परवानगी मिळणार का, याकडे आता पारनेरकरांचे लक्ष लागले आहे.