ADCC Bank Election | नगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या ( ADCC Bank Election ) पार्श्वभूमीवर आज (ता. २७) संगमनेर येथे जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांची बैठक झाली. या बैठकीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व खासदार निलेश लंके हे अनुपस्थित होते.
हे वाचा – दुष्काळ जाहीर झाला, आता सरसकट मदत द्या; रोहित पवारांची मागणी
बैठकीत एकमत ( ADCC Bank Election )
जिल्ह्यात सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, शेतकरी व सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने तसेच अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजवर जपलेली सहकाराची आणि राजकारणविरहित वाटचाल लक्षात घेता, बँकेची निवडणूक टाळून ती बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रयत्न करावेत, अशी भूमिका बैठकीत एकमताने व्यक्त करण्यात आली.
अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा यापूर्वीही जिल्ह्यातील समविचारी मंडळींनी अनेकवेळा जपली आहे. त्याच परंपरेला पुढे नेत, राजकीय मतभेद बाजूला ठेवून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राच्या व्यापक हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
नक्की वाचा : वृद्धाश्रमात चिडविण्याच्या रागातून दोघांचा खून; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न ( ADCC Bank Election )
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून निर्माण होणारी अनावश्यक राजकीय स्पर्धा टाळून बँकेचे कामकाज अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रभावीपणे पुढे न्यावे, तसेच बँकेची प्रगती आणि जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची भक्कम वाटचाल कायम राहावी, या सकारात्मक हेतूने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

या बैठकीला माजी खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार आशुतोष काळे, संग्राम जगताप, हेमंत ओगले, विवेक कोल्हे, विक्रम पाचपुते, प्राजक्त तनपुरे, काशिनाथ दाते, अक्षय कर्डिले, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने आणि श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आमदार मोनिका राजळे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी बैठकीस ऑनलाइन माध्यमातून उपस्थित राहून या सकारात्मक भूमिकेला पाठिंबा दर्शविला. जी नेतेमंडळी आपल्या व्यस्त कार्यक्रमांमुळे आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही, तसेच ज्यांच्यासोबत संपर्क झाला नाही, त्या सर्वांशी समन्वय साधून त्यांना या भूमिकेसोबत घेण्याचा प्रयत्न राहील, असेही सर्व नेत्यांकडून सांगण्यात आले.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राच्या व्यापकहितासाठी सर्व समविचारी मंडळींनी एकत्र येऊन अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सकारात्मक आणि सामंजस्यपूर्ण वातावरण निर्माण करावे, हीच बैठकीची सामूहिक भूमिका ठरली. या बैठकीला उपस्थित सर्वच नेते सहकार क्षेत्रातील दिग्गज घराण्यांतील नेते आहेत.



