Adv. Vishwasrao Athare Patil : नगर : न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय (New Arts, Commerce, and Science College) राज्यात नंबर एक होण्यासाठी आणि स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यासाठी प्राध्यापकांचे मोठे योगदान आहे. मात्र, हेच प्राध्यापक हळूहळू सेवानिवृत्त (Retired) होत असल्याने खंत वाटते. शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असून, तो समाजाला दिशा देत घडवतो, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील (Adv. Vishwasrao Athare Patil) यांनी केले.
नक्की वाचा : अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती
शैक्षणिक योगदानाबद्दल सपत्नीक सन्मान
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील मराठी विभागातील प्रा. डॉ. मच्छिंद्र मालुंजकर व गणित विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्रीकीसन गायकवाड यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू सभागृहात संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यात प्रा. डॉ. मालुंजकर व प्रा. डॉ. गायकवाड यांचा त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल सपत्नीक सन्मान करण्यात आला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
ॲड. आठरे म्हणाले की (Adv. Vishwasrao Athare Patil)
पुढे बोलताना ॲड. आठरे म्हणाले की, प्रा. डॉ. मच्छिंद्र मालुंजकर व प्रा. डॉ. श्रीकीसन गायकवाड यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदांवर कार्यरत आहेत. शिक्षणासोबत जीवनमूल्यांची शिकवण त्यांनी दिली. महाविद्यालयासाठी पूर्ण वेळ देऊन कार्य करणारे प्राध्यापक दुर्मिळ होत असल्याची जाणीव त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे यांनी सांगितले की, मराठी विभागाचे मालुंजकर व गणित विभागाचे प्रमुख गायकवाड यांनी आपल्या कार्यातून ठसा उमटविला. माणुसकी जपत त्यांनी शैक्षणिक योगदान दिले आणि विद्यापीठाच्या जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडल्या.
दोन्ही प्राध्यापकांच्या शैक्षणिक जीवनाचा प्रवास उलगडला
यावेळी माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ. किसन अंबाडे, डॉ. प्रदीप मुटकुळे, डॉ. शिवाजी तरटे, ऋतुजा गायकवाड, रयत शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक विलास ठोकळ, डॉ. सुंदर गोरे तसेच उपप्राचार्य डॉ. अनिल आठरे यांनी भावना व्यक्त करत दोन्ही प्राध्यापकांच्या शैक्षणिक जीवनाचा प्रवास उलगडला. मीनाक्षी मालुंजकर यांनी सांगितले की, मालुंजकर सरांची महाविद्यालयात येण्याची धडपड व शैक्षणिक क्षेत्रातील उत्साह कायम राहिला. सेवाकाळात संघर्षमय वाट तुडवताना त्यांना साथ देण्यात आनंद मिळाला. त्यांनी कामाला प्राधान्य देत रयत शिक्षण संस्था, हिंद सेवा मंडळ आणि जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत उल्लेखनीय योगदान दिल्याचे सांगितले.
दोन आंतरराष्ट्रीय परिषदांचे यशस्वी आयोजन
प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी सांगितले की, प्रा. डॉ. श्रीकीसन गायकवाड यांनी गणित विषयातील दोन आंतरराष्ट्रीय परिषदांचे यशस्वी आयोजन केले. सर्व विभागातील प्राध्यापकांना सोबत घेऊन त्यांनी या परिषदांना यश मिळवून दिले. अकॅडमिक कौन्सिलवरही त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले. तर प्रा. डॉ. मालुंजकर यांनी एनएसएसची जबाबदारी सांभाळत विद्यापीठाच्या पुणे ते पंढरपूर दिंडीचे समन्वयक म्हणून काम केले. कोरोना काळात बाहेर पडून त्यांनी समाजकार्य केले. समाजसेवेचा वसा दोघांनी जपल्याचे म्हंटले.
माजी प्राचार्य झावरे म्हणाले की
माजी प्राचार्य भास्करराव झावरे म्हणाले की, दोन्ही प्राध्यापकांनी शैक्षणिक कार्यात कधीही तडजोड केली नाही. गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण कामे केली, तर मालुंजकर यांनी कोणत्याही कामाला नकार दिला नाही. महाविद्यालयाचे ‘सॉफ्टवेअर’ असलेले हे दोन्ही प्राध्यापक कमी काळात अधिक कामे करणारे होते. चांगले सहकारी लाभल्याचे त्यांनी नमूद केले. ॲड. दिपलक्ष्मी म्हसे यांनीही दोन्ही प्राध्यापकांनी अनेक पीएच.डी. विद्यार्थी घडविल्याचे कौतुक केले.
महाविद्यालयासाठी 25 हजार रुपयांची देणगी जाहीर
सत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. मच्छिंद्र मालुंजकर यांनी आपल्या प्रवासाचा आढावा घेत सांगितले की, ते शेतकरी कुटुंबातून आले असून आई-वडिलांनी शेती गहाण ठेवून शिक्षण दिले. रयत शिक्षण संस्थेत घडून पेमराज सारडा महाविद्यालयात त्यांनी कार्य केले. शिक्षण क्षेत्रातील सर्व पदव्या संपादन करत 75 शोधनिबंध प्रकाशित केले. पुणे ते पंढरपूर विद्यापीठ दिंडी यशस्वी केली. या संस्थेशी कुटुंबाप्रमाणे नाते जोडले गेले असून त्यांनी महाविद्यालयासाठी 25 हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनवण्यावर भर
प्रा. डॉ. किसन गायकवाड यांनी सांगितले की, अध्यापन करताना विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण केली. उच्च शिक्षणासाठी प्रेरित केले आणि स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनवण्यावर भर दिला. 33 वर्षांच्या सेवाकाळात गुणवत्ता वाढीसाठी सेट-नेट मार्गदर्शन आणि संशोधनवृद्धीसाठी प्रयत्न केले. शिक्षण ही केवळ ज्ञान देण्याची प्रक्रिया नसून व्यक्तिमत्त्व घडवण्याची प्रक्रिया आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनीही महाविद्यालयासाठी 35 हजार रुपयांची देणगी जाहीर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या रामचंद्र दरे यांनी दोन्ही प्राध्यापकांना सेवापूर्तीनिमित्त भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. अशोक गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. संजय कळमकर यांनी केले.
परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित
यावेळी खजिनदार ॲड. दिपलक्ष्मी म्हसे, सहसचिव मुकेश मुळे, संचालक तथा माजी प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, उपप्राचार्य (विज्ञान शाखा) डॉ. अनिल आठरे, उपप्राचार्य (वाणिज्य शाखा) डॉ. संजय कळमकर, मीनाक्षी मालुंजकर, गायकवाड, विजय पाटील (निफाड), अण्णा शिंदे (पुणे), प्रा. गणेश भगत, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, शब्बीर शेख, प्रा.डॉ. लक्ष्मण मतकर, डॉ. सोपान झुगे, ऋतुगंधा झुगे, तेजस्विनी मालुंजकर आदींसह सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी व शिक्षकेत्तर सेवकवृंद आणि मालुंजकर व गायकवाड परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.



