counting of votes: नगर: राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी १ लाख ८७ हजार ४६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची (counting of votes) पूर्वतयारी जोरात सुरु आहे. २० टेबलांवर मतमोजणी होणार असून, २७ फेऱ्या होणार आहेत. ४ मे रोजी दुपारी १२ वाजता कोण आमदारकीचा गुलाल घेणार याचा फैसला होणार आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाल्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली. ३ लाख ३३ हजार ५४५ मतदारांपैकी १ लाख ८७ हजार ४६३ मतदारांनी मतदान केले. सरासरी ५६.२० टक्के मतदान झाले.
अवश्य वाचा- अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती
मतमोजणीच्या २७ फेऱ्या होणार (counting of votes)
भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे, अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांच्यासह सात उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रांत बंद झालेले आहे. मतमोजणी ४ मे रोजी राहुरी येथील लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयात होणार असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणेची पूर्वतयारी सुरु झाली. ईव्हीएमची मतमोजणी १४ टेबलांवर, पोस्टल मतांची २ टेबलांवर तर लष्करी जवानांची मतमोजणी ४ टेबलांवर होणार आहे. मतदारसंघात एकूण ३४७मतदान केंद्र आहेत. त्यामुळे मतमोजणीच्या २७ फेऱ्या होणार आहेत. मतमोजणीसाठी एका टेबलवर चार याप्रमाणे ८० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. मतमोजणीस सकाळी आठ वाजता प्रारंभ होणार असून, सकाळी ११.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होणार आहे.



