
Ahilyanagar Municipal Corporation : नगर : अहिल्यानगर महापालिकेने (Ahilyanagar Municipal Corporation) सुधारित विकास आराखडा (Development plan) तयार केला आहे. नव्याने तयार केलेल्या प्रारुप आराखड्यात 519 आरक्षणे प्रस्तावित केली आहेत. यात शहरातील 419.92 हेक्टर क्षेत्र व्यापले जाणार आहे. यामध्ये जुनी 492 आरक्षणे (Reservations) असून, नव्याने 27 प्रस्तावित केली गेली आहेत. हा सुधारित आराखडा गुरुवारी (ता. 30) मनपाच्या विशेष महासभेत सादर करण्यात आला.
नक्की वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; पाथर्डी पोलिसांकडून तरुणाला अटक
सुनावणी करून अंतिम विकास आराखडा होणार
जुन्या आराखड्यानुसार 535 आरक्षणे होती. यापैकी 42 रद्द झाली आहेत. नव्या आराखड्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना घेऊन व त्यावर सुनावणी करून अंतिम विकास आराखडा होणार आहे. नियोजन कालावधीतील लोकसंख्या 2039 साठी 6,48,000 व 2049 साठी 8,10,000 (2011 च्या जनगणने आधारे 3,46,755) एकूण नियोजन क्षेत्र 6,809.1 हे. (68.09 चौ.किमी.) धरण्यात आले आहे.नियोजन क्षेत्र आठ विभागांमध्ये (सेक्टर 1 ते 8) विभागले आहे. अनेक मध्यवर्ती विभाग पूर्णतः विकसित व दाट वस्तीचे असल्याने आरक्षणाचे निकष प्रत्येक विभागासाठी स्वतंत्रपणे न ठरवता संपूर्ण अहिल्यानगर शहर एक एकात्मिक नियोजन घटक मानून ठरविण्यात आले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
गरजेप्रमाणे आवश्यक ते बदल करण्यात आले (Ahilyanagar Municipal Corporation)
राज्य नगररचना विभागाचे निकष व युआरडीपीएफएल यांचा आधार घेण्यात आला असून सुविधांच्या विकेंद्रीकरणावर भर देण्यात आला आहे. जुन्या मंजूर आराखड्यातील आरक्षणे व रस्ते बहुतांशी कायम ठेवून, प्रत्यक्ष परिस्थितीनुसार व गरजेप्रमाणे आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. प्रारूप विकास आराखड्यात संपूर्ण नियोजन क्षेत्र विकसनशील क्षेत्र 6,081.97 हे. (89.32%) व अविकसनशील क्षेत्र 727.13 हे. (10.68%) असे विभागले आहे. एपीएमसी/मार्केट यार्ड आस्तित्वात असून व्यावसायिक क्षेत्रे, औद्योगिक क्षेत्रे यासारख्या आर्थिक संकल्पना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. नदी व नाल्याकाठास हरित पट्टे प्रस्तावित केले आहेत.
नियोजन समिती करण्यात येणार
या प्रारुप विकास आराखड्यात महासभेची मान्यता मिळाल्यानंतर, हा प्रारूप आराखडा नागरिकांच्या माहितीसाठी आणि त्यांच्या सूचना व हरकती मागवण्यासाठी प्रसिद्ध केला जाणार आहे. नागरिकांकडून प्राप्त होणार्या सूचना आणि हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी नियोजन समिती करण्यात येणार आहे. या समितीवर स्थायी समितीच्या तीन सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णयही याच महासभेत घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
अशी आहेत 18 प्रकारची आरक्षणे
खेळाचे मैदान (प्ले ग्राऊंड)- 94, उद्यान/बाग-90, भाजी मार्केट/शॉपिंग सेंटर/ मार्केट-65, शैक्षणिक सुविधा-53, इतर (सार्वजनिक/निम सार्वजनिक) बेघरांसाठी घरे, झोपडपट्टी पुनर्वसन इत्यादी-42, महापालिका प्रयोजन-39, आरोग्य सुविधा-33, पार्किंग-33, ग्रंथालय-12, समुदाय/बहुद्देशीय सभागृह-11, स्मशानभूमी-10, कब्रस्तान-8, घनकचरा व्यवस्थापन स्थळ-8, शहर बस वाहतूक (एएमटी) बस स्थानक/इव्ही चार्जिंग स्टेशन-7, अग्निशमन केंद्र-4, मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र (एसटीपी)-4, टाऊन हॉल-3 व जल उपसा केंद्र-2.
ग्रीड आयर्न व रेडियल रस्ते जाळे
नालेगाव-बोल्हेगाव व लगतच्या सुमारे 600 हेक्टर नव्या निवासी क्षेत्रासाठी ग्रीड आयर्न व रेडियल रस्ते जाळे प्रस्तावित. त्यामुळे भविष्यातील सुनियोजित विकास शक्य होईल. याशिवाय, शहरातील गजबजलेल्या मध्यवर्ती क्षेत्रात संपूर्ण रुंदीकरणाऐवजी चितळे रोड, जुना बाजार, सर्जेपुरा, दिल्ली दरवाजा, माळीवाडा गेट अशा निवडक प्रमुख वाहतूक मार्गांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.


