
नगर : पेरणी झाली ९९ टक्के, पण पदरी पडणार काय? असा हताश सवाल आज अहिल्यानगर (Ahilyanagar News) जिल्ह्यातील बळीराजा (Farmers) विचारत आहे. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरिपाचा हंगाम फुलवला खरा, पण ऑगस्ट महिन्याने या सगळ्या चित्रावर विरजण घातल आहे. पावसाने दिलेल्या ओढीमुळे मका, सोयाबीन, मूग आणि उडीद यांसारख्या प्रमुख पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला असून, यंदा उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. त्यातच आता शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावले असून सोयाबीन, तूर आणि कपाशी पिकावर रस शोषणाऱ्या किड्यांचा हल्ला (Attack of sap-sucking insects on the crop) होतांना दिसत आहे. यामुळे शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे.
नक्की वाचा : नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; ७ जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी
खरिपाची पेरणी किती हेक्टरवर? (Ahilyanagar News)
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या अहवालानुसार, अहिल्यानगर जिल्ह्याचे खरिपाचे सरासरी क्षेत्र ७ लाख १६ हजार २०८ हेक्टर असून त्यापैकी ७ लाख ९ हजार २७१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात मका (१६२.७७टक्के), तूर (१३३.९६ टक्के) आणि सोयाबीन (११२.११ टक्के) या पिकांची सरासरीपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. तर बाजरी, मूग, उडीद आणि भुईमूग या पिकांचे पेरणी क्षेत्र घटले आहे. तर कपाशी पिकाची १ लाख ४२ हजार २६५ हेक्टरवर (९२ टक्के) लागवड झालेली आहे.
सध्या पावसाने गेल्या महिनाभरापासून मोठा खंड दिल्याने खरीप हंगामातील पिकांनी आता शेवटची घटका मोजण्यास सुरूवात केली आहे. गेल्या महिनाभरापासून सततच्या ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यात सोयाबीन, तूर आणि कपाशी पिकावर रस शोषणाऱ्या किड्यांचा हल्ला होतांना दिसत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप हंगामात पेरणी झालेल्या पिकांची दुरावस्था झालेली असून परतीचा पाऊस न झाल्यास रब्बी हंगामाच्या पेरण्याची स्थिती बिकट होणार आहे.
अवश्य वाचा : नव्या चेहऱ्यांची नवी प्रेमकहाणी; ‘धप्पा’चा रोमँटिक फर्स्ट लुक पोस्टर समोर
सोयाबीन व मक्याची वाढ खुंटली (Ahilyanagar News)
१ ते २४ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात केवळ २३.३ मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या जिल्ह्यातील भात, बाजरी आणि तूर ही पिके वाढीच्या संवेदनशील अवस्थेत असून त्यांना मोठ्या पावसाची अत्यंत गरज आहे. मूग आणि उडीद ही पिके सध्या शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहेत, तर सोयाबीन फुलोरा आणि कापूस पाते धरण्याच्या अवस्थेत आहे. पावसात पडलेल्या खंडामुळे सोयाबीन व मक्याची वाढ खुंटली आहे. जिल्ह्यात आतापासून विविध शासकीय योजना, तलाव आणि पाईपलाईनमधून पाण्याची पळवापळवी सुरू झाली आहे. पाऊस न झाल्यास अहिल्यानगर जिल्ह्याच्या विविध भागात शेतीच्या पाण्यासाठी लुट होणार असल्याचे चित्र आतापासून दिसत आहे. पाटपाणी असणाऱ्या भागात शेतकऱ्यांना दिलासा असला तरी उर्वरित ठिकाणी बळीराजाचे हाल होणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत. शेतकऱ्यावर ओढवलेल्या या संकटावर ते नेमकी कशी मात करणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.


