Akshay Kardile | नगर : राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भव्य जाहीर सभा राहुरी शहरात आयोजित करण्यात आली आहे. ही सभा दिनांक 20 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता होणार असून पर्यटन मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी दिली. या सभेमुळे निवडणुकीच्या प्रचाराला मोठी गती मिळणार असून भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जनतेला वेठीस धरण्याचे काम विरोधकांनी केले (Akshay Kardile)
यावेळी बोलताना प्रदेश महामंत्री विजय चौधरी म्हणाले की, स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी सातत्याने काम केले. त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध लाभदायी योजना जनतेच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. जनमानसात राहून काम करणाऱ्या या लोकनेत्याच्या दुःखद निधनानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती.मात्र विरोधकांनी या ठिकाणी घाणेरडे व द्वेषाचे राजकारण करत निवडणूक लावली. जनतेला वेठीस धरण्याचे काम विरोधकांनी केले असून त्याचा रोष जनता मतदानातून व्यक्त करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अवश्य वाचा – रुपाली चाकणकरांच्या बहिणीने सर्व आरोप फेटाळले; ‘ती’ खाती बनावट असल्याचे स्पष्टीकरण
भाजप महायुतीचा आमदार असणे गरजेचे (Akshay Kardile)
ते पुढे म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असून विकासकामांना गती देण्यासाठी राहुरी मतदारसंघातही भाजप महायुतीचा आमदार असणे गरजेचे आहे. त्यामुळे जनता अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे पहा – आगडगावमध्ये भरते भुतांची जत्रा
या वेळी आमदार मोनिका राजळे, महापौर ज्योती गाडे, संपर्क मंत्री रविंद्र अनासपुरे, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते आदी उपस्थित होते. दरम्यान, प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांना भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या सभेकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला निर्णायक वळण मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.



