Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण करणे गरजेचे : जिल्हाधिकारी

Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण करणे गरजेचे : जिल्हाधिकारी

0
Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण करणे गरजेचे : जिल्हाधिकारी
Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण करणे गरजेचे : जिल्हाधिकारी

Ambedkar Jayanti : नगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताच्या संविधानाचे शिल्पकार नव्हते तर ते सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते. त्यांचे विचार आणि जीवनमूल्ये आजही समाजाला दिशादर्शक ठरतात. त्यांच्या विचारांचे आचरण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच सामाजिक समता सप्ताहाच्या समारोपानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, जात पडताळणी विभागाचे सदस्य सचिव अनिल तिदमे, व्याख्याते डॉ. बापू चंदनशिवे, सीएसआरडीचे डॉ. सुरेश मुगुटमल, संजय आरणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :  एटीएम फोडल्या प्रकरणी अटकेत असणाऱ्या आरोपीचे गळ्यावर ब्लेडने वार

जिल्हाधिकारी डॉ.आशिया म्हणाले , “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्याचे महान कार्य केले. त्यांनी देशातील सर्वसामान्य नागरिकांना मतदानाचा अधिकार प्रदान केला आणि लोकशाहीची भक्कम पायाभरणी केली; त्यामुळेच आजही देशातील लोकशाही सक्षमपणे टिकून आहे.” समाजातील विषमता दूर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर अखंड संघर्ष केला. त्यांनी सर्व घटकांना सोबत घेत समानतेचा मार्ग समाजासमोर ठेवला. त्यांच्या विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी दिलेले मार्गदर्शन आत्मसात करून आपण समाजात सकारात्मक आणि शाश्वत परिवर्तन घडवू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

समाजव्यवस्थेला नवी दिशा (Ambedkar Jayanti)

डॉ. बापू चंदनशिवे म्हणाले , “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मानवी हक्कांचे जतन व प्रतिपालन करणारे महान व्यक्तिमत्त्व होते. समाजातील विषमता त्यांनी सखोल अभ्यासातून ओळखून ती दूर करण्यासाठी आयुष्यभर सातत्याने संघर्ष केला. ‘मूकनायक’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी वंचित, शोषित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. तसेच महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहातून सामाजिक समतेसाठी त्यांनी ऐतिहासिक लढा उभारला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा संगम असलेली राज्यघटना देशाला देऊन डॉ. आंबेडकरांनी समाजव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे.”

नक्की पहा : अहिल्यानगरमध्ये आर्मीच्या वाहनाला ट्रकची धडक

लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप (Ambedkar Jayanti)

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी समता सप्ताहामध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांची तसेच विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच विविध योजनांमधील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सॅम्युअल वाघमारे यांनी केले, तर आभार डॉ. प्रदीप जारे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.