महानगरपालिकेने बँकांकडून कर्जपुरवठ्यासाठी प्रस्ताव मागवले – आयुक्त यशवंत डांगे यांची माहिती
AMC : नगर : महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातील (Development Plan) पाच महत्त्वाच्या व्यापारी संकुलाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी महानगरपालिकेने (AMC) प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकल्पांसाठी आवश्यक निधीपैकी ७५ टक्के निधी कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील बँकांकडून प्रस्ताव मागवण्यात आल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी दिली आहे.
नक्की वाचा: दगडफेक करत वाहनाची तोडफोड; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बँकांना सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
महानगरपालिकेने हाती घेतलेल्या या पाच मोठ्या प्रकल्पांमध्ये चितळे रोड येथील नेहरू मार्केट विकसित करण्याच्या प्रकल्पाचा समावेश असून त्याची एकूण किंमत ११.४२ कोटी रुपये आहे व त्यासाठी ८.५६ कोटी रुपयांच्या कर्जाची आवश्यकता आहे. सर्जेपुरा रंग भवन येथे व्यापारी संकुल व सांस्कृतिक केंद्र विकसित केले जाणार असून, या ३३.६१ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी २५.२१ कोटी रुपयांचे कर्ज अपेक्षित आहे. याशिवाय प्रोफेसर कॉलनी चौक येथे २७.४८ कोटी रुपयांचे व्यापारी संकुल उभारले जाणार असून त्यासाठी २०.८६ कोटी रुपयांचा वित्तपुरवठा आवश्यक आहे. अहिल्यानगर-मनमाड रोडवरील जुने एनसीसी कार्यालय येथे नियोजित व्यापारी संकुलाची किंमत ३०.४८ कोटी रुपये असून याकरिता २२.८६ कोटी रुपयांची कर्ज आवश्यक आहे. तसेच, गंज बाजार येथे ११.७० कोटी रुपये खर्चून भाजी मंडई व व्यापारी संकुल उभारण्यात येणार असून त्यासाठी ८.७७ कोटी रुपयांच्या कर्जाची आवश्यकता आहे. या प्रकल्पांसाठी दीर्घकालीन कर्ज, स्पर्धात्मक व्याजदर, परतफेडीचा कालावधी आणि इतर आवश्यक अटी व शर्तींचा समावेश असलेला सविस्तर प्रस्ताव बँकांनी सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
महानगरपालिकेला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होणार (AMC)
नवीन व्यापारी संकुलांमधील गाळ्यांचा ई-लिलाव करून त्यातून मिळणारी रक्कम, गाळेधारकांकडून ३० वर्षांच्या लीजवर ‘नॉन-रिफंडेबल डिपॉझिट’ जमा केले जाईल आणि सोबतच गाळ्यांचे मासिक भाडे मिळेल व यातून कर्जाची रक्कम फेडण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. या संकुलाच्या माध्यमातून महानगरपालिकेला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल, असा विश्वास आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केला.



