AMC : नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंज बाजार परिसरात विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. भाजी मंडई व आसपासच्या परिसरातील काही व्यावसायिकांकडून रस्त्यावर स्टॉल, साहित्य व अन्य वस्तू ठेवून अतिक्रमण करण्यात येत असल्याने नागरिकांच्या वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता.
हेही वाचा : जिहादी प्रवृत्तींना इथल्या मातीत राहण्याचा अधिकार नाही; आमदार संग्राम जगताप आक्रमक
वारंवार अतिक्रमण
गंज बाजार हा शहरातील महत्त्वाचा सराफ व व्यापारी परिसर असून येथे दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे रस्ते मोकळे व सुरक्षित राहणे अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वीही संबंधित ठिकाणी अनेक वेळा अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली होती. मात्र वारंवार सूचना, समुपदेशन आणि कारवाई करूनही काही व्यावसायिकांकडून पुन्हा अतिक्रमण करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.
नक्की पहा : दिल्ली गेट परिसरात पुन्हा वाहनाची दुभाजकाला धडक
सक्त सूचना (AMC)
यावेळी महानगरपालिकेने केवळ अतिक्रमण हटविण्याची कारवाई न करता संबंधित व्यावसायिकांना समुपदेशन करून सार्वजनिक रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवण्याबाबत सक्त सूचना दिल्या. तसेच भविष्यात पुन्हा अतिक्रमण आढळून आल्यास दंडात्मक कारवाईसह माल जप्ती व इतर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. अहिल्यानगर महानगरपालिका नागरिकांच्या सुरक्षित, सुकर व सुरळीत वाहतुकीसाठी कटिबद्ध असून शहर अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी अशा मोहिमा यापुढेही नियमितपणे सुरू राहणार आहेत.



