AMC : नगर : शहरात अगदी रस्त्याच्या कडेला नारळाची दोरी, मातीची भांडी किंवा कापडी पिशव्या विकायच्या असतील, तरी आता अहिल्यानगर महानगरपालिकेचा परवाना आवश्यक असणार आहे. केवळ कामगार विभागाकडून शॉप ॲक्ट नोंदणी करून व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यावसायिकांना आता महानगरपालिकेकडे स्वतंत्र नोंदणी व परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवाना न घेता व्यवसाय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह व्यवसाय बंद करण्याची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
हेही वाचा : जिहादी प्रवृत्तींना इथल्या मातीत राहण्याचा अधिकार नाही; आमदार संग्राम जगताप आक्रमक
मनपाचा परवाना अनिवार्य
महानगरपालिकेच्या हद्दीत विविध आस्थापनांना परवाने देण्यासाठी आरोग्य लायसन्स विभाग कार्यरत आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ४५८ (४८) अन्वये नव्या उद्योग-धंद्यांना परवानगी देण्याबाबतचा उपविधी मंजूर करण्यात आला आहे. या उपविधीनुसार शहरातील सर्व उद्योग, धंदे आणि व्यवसायांसाठी मनपाचा परवाना घेणे, तसेच त्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे अनिवार्य आहे.
नक्की पहा : दिल्ली गेट परिसरात पुन्हा वाहनाची दुभाजकाला धडक
‘या’ व्यवसायांना लागणार परवाना (AMC)
मनपाने प्रसिद्ध केलेल्या यादीत नारळाची दोरी, रद्दी, मातीची भांडी, बांबू साहित्य, कापडी पिशव्या, भंगार, मालवाहतूक कार्यालये, मोबाइल विक्री, बेकरी, आईस्क्रीम, सलून, प्रिंटिंग प्रेस, फोटो स्टुडिओ, केबल ऑपरेटर, नाट्यगृहे, मंगल कार्यालये, कृषी सेवा केंद्रे, मटन-चिकन विक्री, किराणा दुकाने, भाजीपाला विक्री, अंडी विक्री, बांगड्या विक्री यांसह तब्बल ३६८ प्रकारच्या व्यवसायांचा समावेश आहे.



