Ashadhi Vari : नगर : आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचा पायी प्रवास सुखकर, सुरक्षित आणि आरोग्यदायी व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामार्फत ‘चरणसेवा’ उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मातोश्री आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कर्जुळे हर्या, ता. पारनेर यांच्या माध्यमातून आणे येथे श्री रंगदास स्वामी पायी दिंडी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी चरणसेवा, मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
नक्की वाचा : डांबरी रस्त्यावर डागडुजी करताना टाकला मुरूम; गटाराची पाईपलाईन फुटल्याने घाण पाणी रस्त्यावर
आयुर्वेदिक औषधी तेलाने मालिश
या शिबिरामध्ये सुमारे १९० वारकरी सहभागी झाले. त्यापैकी १०६ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच १०६ वारकऱ्यांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. याशिवाय ८० वारकऱ्यांना आयुर्वेदिक औषधी तेलाच्या साहाय्याने चरणसेवा देण्यात आली. वारकऱ्यांच्या पायांना आयुर्वेदिक औषधी तेलाने मालिश करण्यात आल्यामुळे दीर्घ पायी प्रवासामुळे आलेला ताण व थकवा कमी होण्यास मदत झाली. त्यामुळे पुढील प्रवासासाठी वारकऱ्यांना नवचैतन्य लाभले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आरोग्यविषयक मार्गदर्शन (Ashadhi Vari)
यावेळी वारकऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमामध्ये मातोश्री आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील ३० डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वारकऱ्यांना सेवाभावाने आरोग्य तपासणी, औषधोपचार व चरणसेवा उपलब्ध करून देण्यात आली.



