Ashok Kharat : नगर : भोंदू अशोक खरात नॉमिनी असलेल्या कोट्यवधीच्या संशयास्पद व्यवहारात संशयाच्या गर्तेत सापडलेली ‘समता पतसंस्था’ पोलिस आणि ईडी तपासानंतर आता सहकार विभागाच्याही रडारवर आली आहे. समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील ‘त्या’ खातेदारांची ई केवायसी तपासणीसाठी जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीची नियुक्त करण्यात आली आहे. समितीने तपासणीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे यांनी दिले आहेत.
संशयास्पद खातेदारांची चौकशी
नाशिकचा भोंदू खरात नॉमिनी असलेली सुमारे शंभर खाती समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत वेगवेगळ्या नावांनी असल्याचे पोलिस तपासात समोर आले. या खात्यांत सुमारे ६० कोटींहून अधिक व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. शिर्डी पोलिसांनी समतामधील शंभर संशयास्पद खातेदारांची चौकशी करत खातेदारांचे जवाब नोंदविले आहेत. या जबाबांनुसार ५० हुन अधिक खातेदारांनी कागदपत्रे आपली असल्याचे कबूल केले; मात्र त्यावरील सहीचा इन्कार केला. या जबाबानंतर ‘समता’तील ती खाती ईडीच्या रडारवर आली.
हेही वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना न्यायालयाचा दिलासा; पुराव्याअभावी आयकर विभागाचा दावा फेटाळला
केवायसीबाबत शंका (Ashok Kharat)
समता पतसंस्थेतील एक लाखाच्या आतील कर्जावरील व्याजदर आणि सोनेतारण संदर्भातील व्यवहारांचीही पडताळणी होणार का? याबाबत मात्र संदिग्धता असल्याचे दिसते. ‘आजपर्यंत तरी असे कोणतेही आदेश नाहीत, मात्र वरिष्ठांचे आदेश आले तर तशी कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण सहकार विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. खात्यांना एकच व्यक्ती वारसदार आहे. या खात्यांच्या केवायसी पूर्ततेबाबत शंका उपस्थित होत असून, त्यावर व्यवहार झाल्याचेही नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे ‘समता’च्या राहाता शाखेतील खात्यांची चौकशी करण्याचे आदेशात म्हटले आहे.
नक्की पहा : अहिल्यानगर शासकीय मेडिकल कॉलेजचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ नामकरण
सहकार आयुक्तांच्या आदेशानुसार तपासणीसाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याबाबत समता पतसंस्थेला पत्र दिले आहे. सहायक निबंधक तसेच ऑडिटर पथकाच्या माध्यमातून तपासणी सुरू करण्यात आली आहे. स्वतः यामध्ये लक्ष घातलेले आहे. वेळेतच स्वयंस्पष्ट अहवाल वरिष्ठांना दिला जाईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली आहे.



