Bakri Eid : पारनेर : देशभरात आज (ता. २८) मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ‘बकरी ईद’ (Bakri Eid) (ईद-उल-अजहा) अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यातही (Parner Taluka) सर्वत्र आनंदाचे आणि सलोख्याचे वातावरण पाहायला मिळाले. तालुक्याचे मुख्य केंद्र असलेल्या पारनेर शहरासह सुपा, निघोज, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी, दरोडी, पिंपळगाव रोठा, भाळवणी यांसह ग्रामीण भागातील बहुतांश गावांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात आला.
नक्की वाचा : पाथर्डी बाजारपेठेच्या समस्यांवर व्यापारी आक्रमक; मूलभूत सुविधा द्या, अन्यथा ‘पाथर्डी बंद’चा इशारा
बंधुभाव टिकून राहावा यासाठी विशेष प्रार्थना
पारनेर शहरातील मुख्य ईदगाह मैदान येथे आज (ता. २८) सकाळी शहरातील सर्व मुस्लिम बांधव पारंपरिक पोशाखात एकत्र आले होते. यावेळी सर्वांनी सामूहिक नमाज पठण केले. नमाजनंतर देशात शांतता, समृद्धी आणि बंधुभाव टिकून राहावा यासाठी विशेष प्रार्थना (दुआ) करण्यात आली. नमाज संपन्न झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट घेऊन ईदच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. यावेळी लहान थोरांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
एकोपा टिकवून ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी (Bakri Eid)
या पवित्र सणाचे औचित्य साधून पारनेर येथील ईदगाह मैदानावर संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. आर. जी. सय्यद उपस्थित होते. त्यांनी उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांना संबोधित करताना मोलाचे सामाजिक प्रबोधन केले “बकरी ईद हा सण त्याग, समर्पण आणि अमूल्य मानवी मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देतो. समाजात शांतता आणि एकोपा टिकवून ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. संतांच्या भूमीत आपण राहतो, त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आपण सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक सलोखा अधिक मजबूत केला पाहिजे,” असे आवाहन डॉ. सय्यद यांनी केले.
पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
त्यांच्या या मार्गदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली. ग्रामीण भागातही सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. पारनेर तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक संतोष खेडकर आणि पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकूणच, पारनेर तालुक्यातील ही बकरी ईद सामाजिक सलोखा आणि बंधुभाव अधिक दृढ करणारी ठरली.



