
Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan : नगर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात (Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan) सहभागी झालेल्या अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय पथकाकडून पाहणी सुरू असून, त्याअंतर्गत सोमवारी अहिल्यानगर तालुक्यातील मांजरसुंबा (Manjarsumba) ग्रामपंचायतीची सविस्तर तपासणी करण्यात आली. ग्रामपंचायतीने राबविलेल्या विविध विकासकामांचा, स्वच्छता उपक्रमांचा तसेच नागरिकाभिमुख योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा यावेळी घेण्यात आला.
नक्की वाचा : वादळी पावसामुळे अहिल्यानगर शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा विस्कळीत
कार्यालयीन कामकाजाची केली पाहणी
पाहणीसाठी आलेल्या पथकात सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, गट विकास अधिकारी प्रकाश शिपुरे आणि पोपट सुतार यांचा समावेश होता. पथकाने ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन कामकाजाची पाहणी करत विविध नोंदवही, अभिलेखे आणि योजनांच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
ग्रामस्थांनी राबवलेल्या उपक्रमांचे सादरीकरण (Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan)
यावेळी सरपंच रूपाली कदम यांनी ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या विकासकामांची माहिती सादर केली. गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण, डिजिटल प्रशासन आणि ग्रामस्थांच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. उपसरपंच जालिंदर कदम व ग्रामसेवक सारिका वाळुंज यांनीही विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली.

पथकाने गावातील विविध प्रकल्पांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून गावातील सुविधा आणि विकासकामांबाबत अभिप्राय जाणून घेतला. अभियानाच्या निकषांनुसार ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे मूल्यांकन करण्यात आले.
या पाहणीवेळी ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हास्तरीय पथकाच्या भेटीमुळे गावातील विकासकामांना चालना मिळण्याबरोबरच ग्रामपंचायतीच्या कार्याची दखल घेतली जात असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.


