नगर : वय खेळण्याबागडण्याचे, हातात पुस्तक घेण्याचे, पण याच वयात त्यांच्या गळ्यात लग्नाची बेडी अडकवण्याचा प्रयत्न केला जात होता. हो अशी घटना घडली आहे, अहिल्यानगर जिल्ह्यात. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात एकाच दिवसात प्रशासनाने १० बालविवाह (Child Marriage) रोखले आहेत, मात्र या घटनेवरून समाजात अजूनही अशा अनिष्ट प्रथा कशा मूळ धरून आहे, हेच पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रशासनाच्या या धडक कारवाईचा नेमका घटनाक्रम काय? जाणून घेऊया…
नक्की वाचा: छातीवर वळ, तोंडात मोजा; नसरापूर पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात नेमकं काय?

महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात एका दिवसात होणारे तब्बल १० बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. या कारवाईमुळे बालविवाह प्रतिबंधाबाबत प्रशासनाची सजगता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
अवश्य वाचा: राहुरीत अक्षय कर्डिलेंचा मोठा विजय; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे पराभूत
आता घडलं काय? (Child Marriage)
रविवारी ३ मे ला संपूर्ण जिल्ह्यातच लग्नांची मोठी रेलचेल होती. कारण या दिवशी मोठी लग्नतिथी होती. याच दिवशी जिल्ह्यात तब्बल एकाच दिवशी ११ बालविवाह होत असल्याची गुप्त माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे, कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे बालविवाह रोखण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईत नगर शहरात ३, अकोलेत १, राहुरी १, श्रीगोंदा १, पाथर्डी १, नेवासा १ , नगर तालुक्यात १, श्रीरामपूर १ असे १० बालविवाह थांबविण्यात आले.
वधू आणि वरांच्या पालकांना नोटीस (Child Marriage)
या मोहिमेत पोलीस यंत्रणा, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका, जिल्हा बालसंरक्षण कक्ष तसेच चाइल्ड हेल्पलाइन कक्ष यांचा सक्रिय सहभाग राहिला. सर्व यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून ही कारवाई करण्यात आली. नागरिकांनीही अशा घटनांची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बालविवाह रोखण्यात आलेल्या वधू आणि वरांच्या पालकांना जिल्हा बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले असून यापुढे त्यांनी करण्याची नोटीस सुद्धा त्यांना बजावण्यात आलेली आहे. महिला बालकल्याण विभागाने जिल्ह्यात होणाऱ्या तब्बल १० बालविवाहांचा कट उधळून लावल्याने सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.



