Council of Excluded Classes: पाथर्डी: येथील श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ संचलित गुरु आनंद संगीत मंडळ, आनंद संगीत अकॅडमी व आनंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भीमगीत, प्रबोधनपर गीत, नृत्य व नाट्य अशा विविध कलाप्रकारांनी सजलेला बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम श्री तिलोक जैन विद्यालयाच्या भव्य प्रांगणात उत्साहात पार पडला. यावेळी बहिष्कृत वर्ग परिषद (Council of Excluded Classes) विषयावरील नाटिका प्रभावी ठरली. गत दहा वर्षांपासून संस्थेचे सचिव सतीश गुगळे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होत आहे. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रसंत, आचार्य सम्राट आनंदऋषीजी महाराज साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नाट्यप्रयोगांनी कार्यक्रमाला वेगळी उंची (Council of Excluded Classes)
सतीश गुगळे यांनी सादर केलेले उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे हे गीत प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. भारत गाडेकर यांचे माझी आजी म्हणायची, डॉ. श्रीकांत काळोखे यांचे आकाश मोजतो आम्ही भिमा तुझ्या जन्मामुळे, बिपिन खंडागळे यांचे काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने, चंदन कुचेरिया यांचे छाती ठोक हे सांगू जगाला,विशाल एकम यांचे दोनच राजे इथे गाजले, संजय राजगुरु यांचे भिम सूर्य क्रांतीचा तसेच बाळासाहेब गांगुर्डे यांचे भिम माझा कोहीनूर हिरा या गीतांनी कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.कथक नृत्यातून दिलेली मानवंदना, विविध नृत्य सादरीकरणे आणि नाट्यप्रयोगांनी कार्यक्रमाला वेगळी उंची प्राप्त करून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या ‘मूकनायक’ या वृत्तपत्राच्या स्थापनेचा प्रसंग, समतेचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज यांचे सहकार्य, माणगाव परिषदेतील बाबासाहेबांचे भाषण, स्वातंत्र्यप्राप्तीपूर्व १८ वर्षे आधी शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा केलेला गौरव तसेच गिरगाव चाळीत त्यांच्या घरी दिलेली भेट या ऐतिहासिक प्रसंगांचे नाट्यरूपांतर प्रेक्षकांना भावले. दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्ग परिषद (ता. २१ व २२ मार्च १९२०) या ऐतिहासिक घटनेवर आधारित नाटिकेचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.
नक्की वाचा- व्याख्यानाच्या कार्यक्रमात डीजेचा खोडा; संगमनेरमध्ये राडा
सामाजिक परिवर्तनाचा प्रेरणादायी संदेश (Council of Excluded Classes)
या नाटिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांच्या सहभागाचे जिवंत चित्रण करण्यात आले. दलित हक्क, शिक्षणाचा अधिकार आणि सामाजिक समतेसाठीचा संघर्ष यांचे प्रभावी दर्शन कलाकारांनी घडवले. या सादरीकरणामुळे उपस्थितांना इतिहासाची जाणीव होऊन सामाजिक परिवर्तनाचा प्रेरणादायी संदेश मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाद्यवृंदात सचिन साळवे, अल्ताफ शेख व राजेंद्र चव्हाण यांनी उत्कृष्ट साथ दिली. तसेच आतिश भावसार, आदेश कर्णावट, सचिन ढाकणे, संतोष घोगरे, सुनील कटारिया, डॉ. श्रीकांत काळोखे, डॉ. अनिल पानखडे, प्रा. सूर्यकांत काळोखे व सुनील मरकड यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक व स्वागत सतीश गुगळे, सूत्रसंचालन सुनील कटारिया तर आभार प्राचार्य अजय भंडारी यांनी मानले.



