DC : नगर : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे. ग्रामस्तरावरील अधिकारी आणि कर्मचारी यांनी गावात जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव व ढोरेज येथे विविध विकासकामांची पाहणी तसेच अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते.
हेही वाचा : रॉड तुटल्याने स्कूल बस पलटी; १५ ते २० विद्यार्थिनी किरकोळ जखमी
आरोग्य केंद्राला भेट
दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी कोळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. आरोग्य केंद्र परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि रुग्णाभिमुख ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सुविधा सक्षम ठेवाव्यात. तसेच जास्तीत जास्त सुरक्षित प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्रात होतील, यासाठी आरोग्य यंत्रणेने विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
नक्की पहा : महिलांमध्येच थायरॉईडचं प्रमाण इतकं जास्त का?
ग्रामसचिवालयाचे काम गुणवत्तापूर्ण करा (DC)
यानंतर जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी ग्रामसचिवालय इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून कामाच्या गुणवत्तेचा आणि प्रगतीचा आढावा घेतला. शासकीय इमारतींची बांधकामे निर्धारित वेळेत आणि उच्च दर्जाची पूर्ण करण्याबरोबरच नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध होतील, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.



