Devdatta Gundu | नगर : थायलंडमधील बँकॉक येथे १३ व १४ जून २०२६ रोजी झालेल्या डब्ल्यूआरपीएफ आयर्न वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२६ या जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत देशाचा तिरंगा अभिमानाने फडकावला. या स्पर्धेत ११५ किलो वजन गटातील सिनियर विभागात सहभागी झालेल्या देवदत्त प्रवीण गुंडू (Devdatta Gundu) यांनी अप्रतिम ताकद, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर तब्बल पाच सुवर्णपदके पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.
हे वाचा – बंदुकीचा धाक दाखवून उबेर चालकाला लुटले; एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडली घटना
सुवर्णपदकांची कमाई (Devdatta Gundu)
देवदत्त गुंडू यांनी स्पर्धेतील संपूर्ण पॉवरलिफ्टिंग प्रकार- एसीबीडी, पुश पूल, ओन्ली देड़ीफ्ट, बेंच प्रेस, ओन्ली सुक्ट्स (SBD, push pull, only Deadlift, only bench press, only squats) अशा पाचही प्रकारांमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत सुवर्णपदकांची कमाई केली. जागतिक स्तरावरील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मिळविलेले हे यश भारतीय शक्तीउचल क्षेत्रासाठी अत्यंत गौरवास्पद मानले जात आहे.

देवदत्त गुंडू हे अनेक वर्षांपासून पॉवरलिफ्टिंग खेळामध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. यापूर्वी रशिया येथे झालेल्या डब्ल्यूआरपीएफ जागतिक पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक पटकावून भारताला मान मिळवून दिला होता. तसेच व्हिएतनाम येथे झालेल्या डब्ल्यूआरपीएफ आशियाई पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक कांस्यपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. राष्ट्रीय स्तरावरील विविध अजिंक्यपद स्पर्धांमध्येही त्यांनी अनेक सुवर्णपदके, चषक आणि मानचिन्हे प्राप्त केली आहेत.
अवश्य वाचा – शिंगवेतुकाईतील खतांच्या बोगस कारखान्यावर धाड; २१.८० लाखांचा साठा जप्त
खेळाडूंना प्रशिक्षण (Devdatta Gundu)
देवदत्त गुंडू यांच्या यशामागे कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि खेळाप्रती असलेली निष्ठा हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांनी स्वतः उत्कृष्ट खेळाडू म्हणून नाव कमावतानाच अनेक खेळाडूंना प्रशिक्षण देऊन त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घडविण्याचे कार्यही केले आहे.

त्यांचे शिष्य किशोर यशवंत शिंदे यांनीदेखील या स्पर्धेत शानदार कामगिरी करत ९० किलो वजन गटातील मास्टर-१ विभागात सुवर्णपदक पटकावले. जागतिक स्पर्धेतील हे यश त्यांच्या सातत्यपूर्ण सरावाचे आणि प्रशिक्षक देवदत्त गुंडू यांच्या प्रभावी मार्गदर्शनाचे फलित मानले जात आहे. किशोर शिंदे यांनी यापूर्वी रशिया येथे झालेल्या जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तसेच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतही त्यांनी सुवर्णपदक प्राप्त करून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
या दोन्ही खेळाडूंच्या यशामुळे भारतीय पॉवरलिफ्टिंग क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली असून, महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकविणाऱ्या या खेळाडूंनी युवा पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे. या यशाबद्दल देवदत्त गुंडू यांनी डब्लूआ पीएफ चे अध्यक्ष सुनील लोंचब , राज्य अध्यक्ष सौरभ चौधरी ,शीतल चौधरी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्यांच्या मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सहकार्यामुळे भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावर आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक स्पर्धेत मिळविलेल्या या ऐतिहासिक यशामुळे देवदत्त गुंडू आणि किशोर शिंदे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या या सुवर्णमय कामगिरीने भारतीय पॉवरलिफ्टिंग क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या यशामुळे अनेक युवकांना खेळाकडे आकर्षित होण्याची प्रेरणा मिळणार असून भविष्यातही ते देशासाठी अशीच गौरवशाली कामगिरी करतील, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.



