District Collector : नगर : शासनाच्या ३३ लक्ष वृक्ष लागवड अभियानाची (Tree Plantation Campaign) जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून निर्धारित उद्दिष्टांची शंभर टक्के पूर्तता करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे. वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध शासकीय, सार्वजनिक तसेच सामुदायिक जमिनींचा योग्य वापर करून जिल्ह्याला अधिक हरित (Green) करण्यासाठी काटेकोर नियोजनातून वृक्ष लागवडीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी दिले.
नक्की वाचा : शोक प्रस्तावाच्या कागदात भेळ खाल्ली होती का? राज ठाकरेंचा विधासभाध्यक्ष नार्वेकरांवर हल्लाबोल
विविध विभागांचे अधिकारी उपस्थित
जिल्हाधिकारी कार्यालयात ३३ लाख वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, उपजिल्हाधिकारी वर्षा पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पी.बी. गायसमुद्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अभियानाला गती देण्याचे निर्देश (District Collector)
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, कमी क्षेत्रात अधिक वृक्ष लागवड करून अल्पावधीत हरित पट्टा निर्माण करण्यासाठी मियावाकी प्रकल्प राबविण्यात यावा. वृक्ष लागवड ही केवळ मोहीम नसून पर्यावरण संवर्धनाची दीर्घकालीन जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक लागवड केलेल्या रोपाची नोंद ठेवून त्याचा नियमित आढावा घ्यावा. रोपांच्या जिवंत राहण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.जलसंधारण प्रकल्प परिसर, कालवे, तलाव, बंधारे, रस्त्यांच्या कडा, शासकीय मोकळ्या जागा, शैक्षणिक संस्थांचे परिसर आणि ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात यावी. तसेच मनरेगा, सामाजिक वनीकरण, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या योजनांचा प्रभावी वापर करून अभियानाला गती देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिले.
सर्व विभागांनी लोकसहभाग वाढवून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन
सामुदायिक वनसंपत्ती हक्क असलेल्या पाच गावांची निवड करून तेथे वृक्षलागवडीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा. लागवड केलेल्या रोपांच्या जतन व संवर्धनासाठी आवश्यक नियोजन करून पर्यावरण संवर्धनाला चालना द्यावी. वृक्षलागवडीची सर्व माहिती वेळोवेळी ‘अमृत वृक्ष’ॲपवर अचूकपणे नोंदविण्यात यावी. लागवड केलेल्या रोपांची संख्या, प्रजाती, स्थान तसेच संगोपनाबाबतची माहिती अद्ययावत ठेवून नोंदणीची कार्यवाही निर्धारित कालावधीत पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यात हरित क्षेत्र वाढविणे, हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाणे, भूजल पुनर्भरणास चालना देणे आणि पर्यावरणीय संतुलन राखणे या उद्दिष्टांसाठी सर्व विभागांनी लोकसहभाग वाढवून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.



