नगर : हरवलेल्या मतिमंद शब्बीर जमादार मन्सूरी (Shabbir Jamadar Mansuri) याला मृत समजून त्याच्यावर धार्मिक परंपरेनुसार दफनविधी (Burial)करण्यात आला. मात्र काही दिवसांनी तोच शब्बीर मन्सूरी जिवंत अवस्थेत सापडून सुखरूप घरी परतल्याने नातेवाईक, ग्रामस्थ आणि पोलीस यंत्रणाही अचंबित झालेत. राहुरी (Rahuri News) तालुक्यातील सोनगाव येथे घडलेल्या या घटनेमुळे आता कब्रस्तानात दफन करण्यात आलेला मृतदेह नेमका कुणाचा होता, हा प्रश्न ऐरणीवर आला असून संपूर्ण प्रकरण गूढ बनले आहे.
नक्की वाचा : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना केवळ १ रुपयात मिळणार सरकारी जमीन; राज्यसरकारचा मोठा निर्णय
नेमकं काय घडलं? (Rahuri News)
समोर आलेल्या माहितीनुसार, सोनगाव येथील शब्बीर जमादार मन्सूरी हा मतिमंद असल्याने २१ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घरातून बेपत्ता झाला होता. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय व नातेवाईकांनी अनेक दिवस परिसरात त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. अखेर नातेवाईकांनी २४ मे २०२६ रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे हरवल्याची खबर दिली. याच दरम्यान, जोर्वे परिसरात एका अज्ञात इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. या घटनेची नोंद संगमनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मृत व्यक्तीचे वर्णन आणि शब्बीरच्या शारीरिक वैशिष्ट्यांमध्ये साम्य आढळल्याने त्याच्या नातेवाईकांना ओळख पटविण्यासाठी बोलावण्यात आले.
२७ मे २०२६ ला शब्बीर यांचे नातेवाईक संगमनेर पोलीस स्टेशनला गेले. त्यांनी अज्ञात मृतदेहाची ओळख शब्बीर म्हणून पटवून दिली. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आणि रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. समाजाच्या धार्मिक परंपरेनुसार सोनगाव येथील कब्रस्तानात त्याच दिवशी रात्री त्या मृतदेहावर दफनविधी करण्यात आला. मात्र काही दिवसांनी या संपूर्ण घटनेला अनपेक्षित आणि धक्कादायक वळण मिळाले.
अवश्य वाचा : कोणत्या स्वभाव गुणाचे पुरुष असतात ‘बेस्ट लाईफ पार्टनर’; सविस्तर वाचा…
‘मृत’ शब्बीर जिवंत परतला (Rahuri News)

शब्बीर मन्सूरी हा प्रत्यक्षात चालत चालत अहिल्यानगरला पोहोचला. तेथे एका शेतकऱ्याने त्याची विचारपूस केली असता त्याने भूक लागल्याचे सांगितले. संबंधित शेतकऱ्याने त्याला जेवण दिले. त्याच्याशी संवादादरम्यान त्याने स्वतःचे नाव शब्बीर जमादार मन्सूरी असून आपण सोनगावचा रहिवासी असल्याची माहिती त्याने दिली. या शेतकऱ्याला संशय आल्याने त्याने शब्बीरचे छायाचित्र काढून विविध व्हॉट्सअॅपग्रुपला प्रसारित केले. ही माहिती सोनगावपर्यंत पोहोचताच नातेवाईकांनी व्हिडीओ कॉलद्वारे त्याची ओळख निश्चित केली. या घडलेल्या घडामोडीची माहिती संगमनेर पोलीस स्टेशनला दिल्यानंतर त्याचे चुलत भाऊ व इतर नातेवाईक नगरला आले आणि त्यांनी शब्बीरला ताब्यात घेतले. पुढे नगर, राहुरी व संगमनेर पोलीस ठाण्यात आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला सुखरूप घरी आणण्यात आले.
शब्बीरच्या परतण्याने कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असले तरी आता एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्या मृतदेहावर शब्बीर समजून दफनविधी करण्यात आला, तो मृतदेह नेमका कुणाचा होता? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पोलिसांकडून संबंधित नोंदी, ओळख प्रक्रिया, शवविच्छेदन अहवाल आणि अन्य बाबींची सखोल पडताळणी केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मृत समजून दफन केलेला व्यक्ती काही दिवसांनी जिवंत परत आल्याची ही दुर्मिळ घटना सध्या सोनगाव, राहरी आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. शब्बीरच्या सुखरूप परतण्याचा आनंद व्यक्त होत असतानाच कब्रस्तानात दफन करण्यात आलेल्या मृतदेह नेमका कोणाचं होता हे शोधण्याचं मोठे आव्हान आता प्रशासन आणि पोलिस यंत्रणेसमोर उभे राहिले आहे.



