
Dr. Sujay Vikhe Patil : नगर: जिल्ह्याच्या राजकारणात वेगवेगळ्या विचारांचे आणि राजकीय प्रवाहांचे नेतृत्व एकत्र आणत सहकाराच्या माध्यमातून नवी राजकीय समीकरणे जुळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांची अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (ADCC Bank) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
परस्परविरोधी असलेले सहकाराच्या एका व्यासपीठावर
उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी निवड प्रक्रिया पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून जिल्ह्याच्या राजकारणात परस्परविरोधी राजकीय भूमिका असलेल्या नेतृत्वांना सहकाराच्या एका व्यासपीठावर आणण्यापासून ते जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहकारी संस्थेचे नेतृत्व करण्यापर्यंत डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलेला प्रवास या निवडीच्या निमित्ताने चर्चेत आला आहे.
यांची उपस्थिती (Dr. Sujay Vikhe Patil)
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विधानपरिषद अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांच्यासह नवनिर्वाचित संचालक मंडळातील सदस्य डॉ. सुजय विखे पाटील, शंकरराव गडाख, रणजितसिंह देशमुख, अक्षय कर्डिले, बिपीन कोल्हे, मोनिका राजळे, राजश्री घुले, करण ससाणे, दत्ता पानसरे, सचिन जगताप, ज्योती प्रकाश शिंदे, प्राजक्त तनपुरे, आशुतोष काळे, अनुराधा नागवडे, संगीता जयंत वाघ, कारभारी जावळे, गणपतराव सांगळे, वैभव पिचड, संजीवनी शिंदे, सचिन घुमरे आणि उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे सुरुवातीपासूनच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर प्रभाव असलेल्या विविध राजकीय गटांना एकत्र आणणे, संचालक मंडळात समन्वय निर्माण करणे आणि बँकेच्या हितासाठी सामूहिक नेतृत्वाची भूमिका स्वीकारणे, हे या निवडणुकीतील प्रमुख आव्हान होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री शंकरराव गडाख आणि सभापती राम शिंदे या जिल्ह्याच्या राजकारणातील चार महत्त्वाच्या नेतृत्वांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी डॉ. सुजय विखे यांनी प्रभावीपणे पार पाडली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सहकार क्षेत्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर डॉ. सुजय विखे यांनी केवळ निवडणुकीतील जागांचे गणित न पाहता जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची सद्यस्थिती, विविध संस्थांचे प्रतिनिधित्व आणि स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांचा सखोल विचार केला. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांतील संचालकांशी संपर्क साधणे, त्यांच्या भूमिका समजून घेणे, स्थानिक प्रश्नांवर चर्चा करणे आणि सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करणे, यावर त्यांनी भर दिला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी मंत्री शंकरराव गडाख यांना एका व्यासपीठावर आणून सहकार विकास आघाडीची बांधणी करण्यामध्ये त्यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला. राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या भूमिका असलेल्या नेतृत्वामध्ये समन्वय साधताना प्रत्येक घटकाला सोबत घेण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ राजकीय वर्चस्वाची लढाई न राहता सहकार क्षेत्रातील सामूहिक नेतृत्वाची प्रक्रिया बनविण्याचा प्रयत्न झाला.
या संपूर्ण सहकाराच्या राजकीय समीकरणात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचीही भूमिका महत्त्वाची ठरली आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात प्रा. राम शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे दोन संचालक सहभागी आहेत. त्यामुळे विखे, थोरात आणि गडाख या प्रमुख नेतृत्वांसोबतच प्रा. राम शिंदे यांचाही सहभाग या सहकाराच्या नव्या समीकरणात महत्त्वाचा ठरला आहे. जिल्ह्यातील विविध राजकीय गट आणि नेतृत्वांना एकत्र घेऊन सहकाराच्या माध्यमातून समन्वयाची भूमिका पुढे आणण्यात या सर्व घटकांचा सहभाग या निवडीच्या निमित्ताने चर्चेत आला आहे.
निवडणुक सुरु असताना कोणत्या भागात कोणती राजकीय परिस्थिती आहे, कोणत्या संचालकांची भूमिका काय आहे आणि सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी कोणत्या पातळीवर चर्चा आवश्यक आहे, याचा विचार करून त्यांनी नियोजन केले.काही ठिकाणी स्थानिक पातळीवर मतभेद होते, तर काही ठिकाणी राजकीय आग्रह आणि स्वतंत्र भूमिका होत्या. मात्र, अशा परिस्थितीत संघर्षाची भूमिका न घेता चर्चेतून मार्ग काढण्यावर त्यांनी भर दिला. संचालकांमधील संवाद कायम ठेवणे, गैरसमज दूर करणे आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेला प्राधान्य देणे, या पद्धतीने त्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेत समन्वय साधला. जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वाला एकत्र ठेवण्याची ही भूमिका सहकार विकास आघाडीच्या यशासाठी महत्त्वाची ठरली.
जिल्हा बँकेच्या २१ संचालक मंडळाच्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहमतीने स्थापन झालेल्या सहकार विकास आघाडीने १७ जागांवर विजय मिळवला. या निकालातून जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात सामूहिक नेतृत्वाच्या भूमिकेला संचालकांनी प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले.निवडणुकीनंतर अकोले येथील अपक्ष संचालिका संजीवनी शिंदे यांनीही सहकार विकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे या गटाचे संख्याबळ १८ वर पोहोचले. त्यानंतर आज सकाळी झालेल्या बैठकीत सभापती राम शिंदे यांचे दोन संचालक सचिन घुमरे, ज्योती प्रकाश शिंदे यांनी देखील डॉ. विखे आणि देशमुख यांना पाठिंबा दिला. या संख्याबळाच्या जोरावर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. निवडणुकीतील यशानंतर आता अध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेत राजकीय समन्वयाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. सुजय विखे यांच्याकडेच बँकेच्या नेतृत्वाची जबाबदारी आल्याने या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


